जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील पश्चिम भागातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असून, खराब रस्त्यामुळे वाहनधारकांना रस्त्यांचे मार्ग बदलावे लागत असल्याने डांबराचे रस्ते पूर्णपणे खडीचे झाले आहेत. जळगाव नेऊर ते जऊळके व जळगाव नेऊर ते पिंपळगाव लेप, एरंडगाव ते सातारे, जऊळके ते देशमाने या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली असून, या रस्त्यावर प्रवास करणे कठीण झाले असून, वयोवृद्ध नागरिकांना मात्र वाट दिसू दे गा देवा, वाट दिसू दे, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. रस्त्यांवर मोठमोठ्या पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना, मोठी कसरत करावी लागते. या रस्त्यावर अनेक वेळा छोटे-मोठे अपघात होत असतात. खराब रस्त्यामुळे पाठीचे व मणक्यांचे आजार जडत असून, अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी; अन्यथा या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून गांधीगिरी स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
चारीचा आधार; पण पावसाळ्यात बंद
जऊळके ते जळगाव नेऊर या रस्त्याच्या कडेला दीड किलोमीटर २९ नंबर चारी आहे. खराब रस्त्यामुळे या चारीवरून प्रवाशांना प्रवास करावा लागत असल्याने चारीचा आधार मिळत असला तरी पावसाळ्यात मात्र हा मार्ग बंद होत असल्याने ग्रामस्थांना मुख्य रस्त्यावरून जावे लागते.
जळगाव नेऊर येथे जऊळके पिंपळगाव लेप, नेऊरगाव देशमाने, शेवगे सातारे, पुरणगाव, एरंडगाव या गावांतील शेकडो नागरिक राष्ट्रीय बँक, जिल्हा बँक तसेच खरेदी-विक्रीसाठी येत असतात. त्यामुळे जळगाव नेऊर हे या गावांच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाण असून, रस्त्यांची अवस्था खराब झाल्यामुळे नागरिक वैतागले आहेत.
येवला तालुक्यातील जळगाव ते जऊळके या रस्त्याची झाली दुरवस्था. (२१ जळगाव नेऊर रस्ता)
210821\040521nsk_4_21082021_13.jpg
२१ जळगाव रस्ता