पंचवटी : नाशिक महानगर पालिकेत शिपाई, लिपिक, इलेक्ट्रिशियन तसेच विविध पदांवर नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून नाशिक मालेगाव व मुंबईतील डझनभर बेरोजगार युवकांना आयुक्तांच्या स्वाक्षरीचे बनावट नियुक्तिपत्र देऊन ४३ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी मनपा कर्मचारी सचिन सूर्यवंशी यास पोलिसांनी अटक केली आहे़ बेरोजगारांना जाळ्यात ओढण्यासाठी व विश्वास पटविण्यासाठी सूर्यवंशी हा पाच ते सहा मोबाइल क्रमांकाचा वापर करीत असल्याचे तसेच आवाज बदलून तक्रारकत्यांना सबुरीचा सल्ला देत असल्याचेही समोर आले आहे़पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणूक झालेल्या बेरोजगारांनी दिलेल्या जबाबानुसार संशयित सूर्यवंशी पाच ते सहा मोबाइल क्रमांक वापरत असून तो वेगवेगळ्या फोनवरून पैसे घेतलेल्या बेरोजगारांना आवाज बदलून मी सचिनचा मित्र बोलतो आहे कधी फोन करायचा़ तर कधी व्हॉट्सअपवर मेसेज करून सचिन चांगला असून तो तुमचे काम करेल काम झाले नाही तर पैसे परत देईन त्याच्यावर विश्वास ठेवा आता त्याचा मोबाइल बंद आहे थोड्या वेळाने फोन करा त्याचा फोन चालू होईल असे स्वत: आरोपी त्या बेरोजगारांना सांगायचा. सूर्यवंशी यांच्याविरुद्ध त्याचा मित्र चांगली माहिती देत असल्याने काही बेरोजगार या गोष्टीवर विश्वास ठेवायचे व त्यानंतर सूर्यवंशी याला फोन करायचे त्यावर सूर्यवंशी देखील पैसे परत करण्याचे आश्वासन देत असल्याने बेरोजगारांना काही काळ विश्वास ठेवावा लागला मात्र कालांतराने सूर्यवंशी यांच्यावर फसवणुक तक्रार दाखल झाल्यानंतर सूर्यवंशी याचे बिंग फुटले.तक्रारदार पुढे येत नसल्याची खंतनोकरीसाठी पैसे घेतल्यानंतर संशयित सूर्यवंशी याने वापरत असलेल्या आपल्याजवळील अन्य पाच ते सहा मोबाइल क्रमांकावरून त्याच बेरोजगारांना आवाज बदलून फोन करून तर कधी व्हॉट्सअपवर मेसेज करून तुम्ही सचिनवर विश्वास ठेवा काम झाले नाही तर पैसे परत मिळतील असे संदेश पाठवून विश्वास संपादन करण्याचा प्रकार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने चोराच्या उलट्या बोंबा प्रकार उघडकीस आला आहे. संशयित सूर्यवंशी यांच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करूनही तक्रारदार पुढे येत नसल्याची खंत पोलिसांनी व्यक्त केली आहे.
थांबा, तुम्हाला महापालिकेत नोकरी मिळणार आहे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:43 AM