नाशिक : शहर केवळ स्मार्ट सिटी होऊन उपयोग नाही, नागरिक ‘स्मार्ट’ झाले तरच शहराचा खऱ्या अर्थाने विकास होऊ शकेल, असे मत विविध पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. नाशिकच्या मूलभूत समस्या अजूनही ‘जैसे थे’ असल्याची कबुली महापालिकेत आलटून पालटून सत्तेवर असणाऱ्या पक्षांच्या प्रतिनिधींनी दिली. त्याचप्रमाणे भ्रष्टाचार मुक्त कारभाराची ग्वाही एचपीटी महाविद्यालयात आयोजित ‘राजकीय जनजागृती’ कार्यक्रमात दिली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एचपीटी महाविद्यालयातील पत्रकारिता विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात भाजपाचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते आणि मनसेचे गटनेते अनिल मटाले सहभागी झाले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनिल मटाले यांनी गेल्या पाच वर्षांत पूर्ण केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला तसेच १५ ते २० वर्षांत जी विकासकामे झाली नाहीत ती ४० महिन्यांत केली असल्याचा दावा केला. महानगरपालिकेला अठरा महिने आयुक्त मिळाला नसल्याची अडचण त्यांनी पुढे केली. यावेळी सावजी यांनी शहराचा विकास हेच भाजपाचे ध्येय असून, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणेच महापालिका निवडणुकांमध्येदेखील ‘गुड गव्हर्नन्स’ निर्माण करण्याचा भाजपा पक्षाचा संकल्प असल्याचे सांगितले. पक्षाची ध्येय धोरणे सांगताना लक्ष्मण सावजी यांनी भ्रष्टाचारमुक्त कारभार आणि प्रशासनावर अंकुश ठेवणार असल्याचे सांगितले. शिवसेना नेते अजय बोरस्ते यांनी धार्मिक आणि पर्यटनस्थळ म्हणून नाशिक शहराचा विकास करण्याचा मानस असल्याचे सांगितले. तीर्थक्षेत्र म्हणून नाशिकचा जगभर नावलौकिक असला तरी पर्यटनाच्या माध्यमातून या शहराची नवीन ओळख करून देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकारिता विभागप्रमुख प्रा. डॉ. वृंदा भार्गवे यांनी केले, तर आभार प्रा. रमेश शेजवळ यांनी मानले. न. ब. ठाकूर विधी महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. मेधा सायखेडकर यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले. (प्रतिनिधी)
नाशिकमध्ये मूलभूत सुविधांची प्रतीक्षाच
By admin | Published: January 24, 2017 11:23 PM