नाशिक : महापालिकेचे सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक आयुक्तांनी स्थायी समितीसमोर सादर करून येत्या २० जून रोजी तब्बल तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण होत असून, अद्याप स्थायीकडून महासभेवर अंदाजपत्रक सादर झालेले नाही. महासभेकडून अंदाजपत्रकाला मंजुरी न मिळाल्याने सदस्यांनी सुचविलेल्या कामांना खोळंबा निर्माण झाला आहे. डॉ. प्रवीण गेडाम यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आपले पहिलेच अंदाजपत्रक २० मार्च रोजी स्थायी समितीचे तत्कालीन सभापती राहुल ढिकले यांना सादर केले होते. त्यानंतर आठवडाभरातच निवृत्त होणाऱ्या आठ सदस्यांमध्ये सभापती राहुल ढिकले यांचाही समावेश होता. स्थायी समिती सभापतिपदी राष्ट्रवादीचे शिवाजी चुंबळे आरूढ होऊन आता अडीच महिने उलटले तरी, स्थायीवर सादर झालेल्या अंदाजपत्रकावर चर्चा होऊन त्यात दुरुस्त्या सुचविण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे महासभेवरही अंदाजपत्रक सादर होऊ शकलेले नाही. तत्कालीन सभापती राहुल ढिकले हेच महासभेवर अंदाजपत्रक सादर करणार आहेत; परंतु मध्यंतरी ढिकले यांचे पिताश्री व माजी खासदार उत्तमराव ढिकले यांचे निधन झाल्याने अंदाजपत्रकावर चर्चा होऊ शकली नव्हती तर त्यानंतर ढिकले जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत गुंतल्याने अंदाजपत्रकाला विलंब झाला होता. आता विद्यमान स्थायी समिती सभापती शिवाजी चुंबळे हे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत गुंतल्याने अंदाजपत्रकावर चर्चा घडवून आणण्याला विलंब होत आहे. याशिवाय महापौरांकडूनही अंदाजपत्रकीय सभेची अद्याप घोषणा झालेली नाही. सर्वसाधारणपणे महापालिकेच्या अंदाजपत्रकाला मार्च महिनाअखेरीसच स्थायी व महासभेवर मंजुरी मिळणे अपेक्षित असते; परंतु यंदा आयुक्तांकडूनही स्थायीवर अंदाजपत्रक उशिराने सादर झाले. आता जून महिना संपण्यास दहा-बारा दिवसांचा कालावधी उरला असताना स्थायीकडून महासभेवर अंदाजपत्रक मंजुरीसाठी आलेले नाही. त्यामुळे तूर्त प्रशासनाकडून आयुक्तांचेच अंदाजपत्रक गृहीत धरून कारभार चालविला जात आहे. आयुक्त डॉ. गेडाम यांनी सन २०१५-१६ या वर्षासाठी २१८६ कोटी २३ लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर स्थायीला सादर केले होते. त्यात सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ७४८ कोटी ५६ लाख रुपयांचे स्वतंत्र अंदाजपत्रकही समाविष्ट आहे. (प्रतिनिधी)
अंदाजपत्रक मंजुरीच्या प्रतीक्षेत
By admin | Published: June 18, 2015 11:49 PM