इंदिरानगर : वडाळागाववासीयांची शहर बससेवेची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. बससेवेची गैरसोय केव्हा थांबणार? असा प्रश्न आहे. बससेवा सुरू करण्याची मागणी अद्यापही धूळखात पडून असल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे तातडीने शहर वाहतूक विभागाने बससेवा सुरू करावी, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे .वडाळागाव शेतकरी आणि कामगारवस्ती म्हणून ओळखली जाते. सुमारे बारा हजार लोकांची लोकवस्ती असून, यामध्ये सुमारे ६० टक्के हातावर काम करण्याची वस्ती आहे. मेहबूबनगर, अण्णा भाऊ साठेनगर, जनितनगर, पिंगुळी बाग यांसह परिसरात हातावर काम करणारे बहुतेक नागरिक वास्तव्य करतात. प्रवासी कामासाठी शहरात ये-जा करण्यासाठी आणि गावातील शेकडोच्या संख्येने असलेले विद्यार्थ्यांना शहरात शिक्षण घेण्यासाठी बससेवेची आवश्यकता आहे.परंतु सुमारे वीस वर्षांपासून अद्याप गावात बससेवा सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थी वर्ग आणि गावातील नागरिकांना शहरात बससेवेअभावी रिक्षाने जीवघेणा प्रवास करावा लागतो. रिक्षांमध्ये पाठीमागच्या सीटमध्ये सहा ते सात प्रवासी आणि चालकाशेजारी तीन ते चार प्रवासी असतात तातडीने शहर वाहतूक विभागाने बससेवा सुरू करावी, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.नागरिकांना त्रासशहर वाहतूक बससेवेची ‘जेथे लोकवस्ती आणि रस्ते तेथे बससेवा’ हे ब्रिदवाक्य फक्त नावालाच दिसून येत आहे .गावातील लोकांना बस फक्त मतदानाच्या दिवशी निवडणूक कर्मचारी आणि मतपेट्या ने-आण करताना दिसून येते.बससेवाभावी विद्यार्थी वर्ग आणि नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बससेवेच्या प्रतीक्षा केव्हा संपणार? असा प्रश्न आहे.
वडाळागाववासीयांना शहर बससेवेची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 1:20 AM