खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथील श्रेणी १ चा पशुवैद्यकीय दवाखाना गेल्या अनेक वर्षापासून नियमित वैद्यकीय अधिकाऱ्याच्या प्रतीक्षेत असून परिसरातील शेतकऱ्यांच्या जनावरांवर उपचार मिळत नसल्याने हा दवाखानाच आजारी झाला आहे. पशुसंवर्धन खात्याच्या या अनागोंदी कारभाराबद्दल तीव्र संताप केला जात असून पशुधन बाळगणा-यांच्या चिंतेत भर पडली आहे. स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी कायमस्वरूपी मिळविण्यासाठी अजून किती वर्ष प्रतीक्षा करावी लागणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.खामखेडा हे गाव केंद्रस्थानी आहे. त्यामुळे परिसरातील सावकी, पिळकोस,भउर येथील पशुपालक पशुवैद्यकीय सेवा मिळविण्यासाठी येत असतात. या दवाखान्याला चार पदे मंजूर आहेत. त्यात एक पशु वैद्यकीय अधिकारी, दोन परिचर, एक व्रनोपचारक आहेत. मात्र सद्यस्थितीत या दवाखान्यात एक व्रनोपचारक व एक परिचर असून तात्पुरत्या स्वरु पात ते त्यांच्या ज्ञानाने उपचार करतात. दवाखान्याचा अतिरिक्त पदभार दुस-या अधिका-याकडे सोपवला असून ते आठवड्यातून एक-दोन दिवस तेही बोटावर मोजण्या इतकेच तास कामकाज बघतात. परिणामी ५ ते १० कि.मी.अंतराच्या खेड्यावरून उपचारासाठी आणलेल्या गुरांना उपचार मिळणे तर दूरच परंतु स्थानिक शेतक-यांच्या गुरांनाही शासकीय वैद्यकीय सेवेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे नाईलाजास्तव शेतक-यांना आपल्या गुरांवर खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून महागडा इलाज करून घ्यावा लागतो.
खामखेड्याच्या पशुवैद्यकीय दवाखान्याला डॉक्टरची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 3:45 PM
पशुपालकांची गैरसोय : खासगी डॉक्टरांकडून उपचार
ठळक मुद्देपशुसंवर्धन खात्याच्या या अनागोंदी कारभाराबद्दल तीव्र संताप