म्हाळसाकोरे : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांच्या बांधकामासाठी अनुक्रमे बारा हजार व दोन लाख रुपयांचा निधी शासनाने जाहीर केला असून, महिला बचतगटाने केलेल्या सर्वेक्षणानुसार म्हाळसाकोरेतील २११ कुटुंबे शौचालय बांधकामासाठी निधीच्या प्रतीक्षेत आहेत. येथील ३३४ कुटुंबांकडे शौचालय असून, त्यांचा वापरही केला जात आहे. २११ कुटुंबांना हे अनुदान मिळाल्यास स्वच्छ निर्मलग्राम ही संकल्पना साकारणे सोपे होणार आहे. या योजनेअंतर्गत यापूर्वी कधी १००० रुपये, कधी १५०० रुपये, कधी २५०० रुपये, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ९५०० रुपये असे अनुदान दिले जात होते. आता २ आॅक्टोबरपासून घेतलेल्या निर्णयानुसार केंद्राकडून ७५ टक्के (९००० हजार रु.) व राज्याकडून २५ टक्के (३००० रुपये) असे एकूण १२ हजार रुपये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यापूर्वी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या शौचालयांना किचकट कागदपत्रांच्या प्रकियेमुळे फारसा प्रतिसाद लाभलेला नव्हता. त्यामुळे योजना बंद करण्यात आली होती. (वार्ताहर)
म्हाळसाकोरेकरांना निधीची प्रतीक्षा
By admin | Published: December 22, 2014 11:23 PM