नाशिक : शहरातील लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर घर खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले आहेत. त्यामुळे उपनिबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. परंतु, याठिकाणी दस्तनोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी केलेल्या उपाय योजना अतिशय अपुऱ्या असल्याने नागरिकाना तासंतास ताटकळत उभे राहून दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रतिक्षा करावी लागत असल्याचे चित्र उपनिबंधक कार्यालयात दिसून येत आहे. गेल्या तीन ते चार महिन्यात कोरोनामुळे संपूर्ण जगासमोर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असून या कालावधीत सामान्य नागरिकांना स्वत:च्या मालकीच्या घराची उणीव जाणवल्याने अनेकांनी घर खरेदीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उपनिबंधक कार्यालयात खरेदी विक्रीच्या व्यावहारांसाठी या महिन्याच्या सुरुवातीपासूनच गर्दी वाढू लागली आहे. परंतु, वाढलेल्या गर्दीच्या तुलनेत उपनिबंधक कार्यालयात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात अलेल्या उपाय योजना तोकडया आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपनिबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व सॅनिटायझर व फिजिकल डिस्टन्स राखण्याच्या दृष्टीने उपाय योजना केल्या आहेत. परंतु, या ठिकाणी दस्त नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या तुलनेत अधिक आहेत. शिवाय येथे येणाऱ्या नागरिकांना पाच पाचच्या टप्प्यांने कार्यालयात प्रक्रियेसाठी पाठविले जाते. त्यामुळे कार्यालयाच्या इमारतीच्या आवारात उर्वरीत नागरिकाची गर्दी होते. त्याचप्रमाणे चौथ्या मजल्यावरील कार्यालयात जाण्या येण्यासाठी एकट लिप्ट असल्याने याठिकाणी फिजिकल डिस्टन्सच्या नियमांचेही उल्लंघन असून या ठिकाणी कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना अतिशय तोकड्या आहेत. त्यामुळे नागरिकांना तासंतास ताटकळत उभे राहत आपला नंबर येण्याची प्रतीक्षा करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
नाशकात दस्त नोंदणीसाठी तासंतास प्रतिक्षा ; नागरिकांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 4:23 PM
नाशिक शहरातील उपनिबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. परंतु, याठिकाणी येणाऱ्या नागरिकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी केलेल्या उपाय योजना अतिशय अपुऱ्या आहे. नागरिकाना तासंतास ताटकळत उभे राहून दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे.
ठळक मुद्देदस्त नोंदणीसाठी नागरिकांची गर्दीगर्दी नियंत्रणाच्या उपाययोजना तोकड्या तासंतास ताटकळत उभे राहण्याची वेळ