गेल्या वर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असला तरी अतिवृष्टी तसेच नदीनाल्यांना आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनाचे नुकसान झाले. गेल्या वर्षभरात या कारणांमुळे १६८ जनावरे दगावली. यापैकी १३८ जनावरे मालेगाव तालुक्यात असून या तालुक्यात सर्वाधिक फटका बसला होता. जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून शासनाकडे भरपाईपोटी ७३ लाखांची मागणी केली होती.
या कालावधीत शेतकऱ्यांच्या पिकांची तसेच घरपडझडीच्या नुकसानीची भरपाई शासनाकडून देण्यात आली. मात्र पशुधनाची भरपाई अदा करण्यात आलेली नाही. जिल्हा प्रशासनाकडून याबाबतचा पत्रव्यवहारदेखील शासनाकडे केला आहे. शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षाच करावी लागत आहे. मदत व पुनर्वसन खात्याच्या निकषानुसार मोठ्या दुधाळ जनावरांसाठी प्रत्येकी ३०, बैल २५ तर शेळी, मेंढी, बोकड दगावल्यास तीन हजारांची व कोंबड्या दगावल्यास प्रत्येकी ५० रुपये मदत दिली जाते. त्यानुसार १६८ छोट्यामोठ्या जनावरांच्या नुकसानभरपाईपोटी ७३ लाखांच्या मदतीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. मात्र मदत प्राप्त होण्यास विलंब होत आहे.