नाशिक : विभागातील सुमारे सातशेहून अधिक शिक्षकांना शालार्थ आयडीची प्रतीक्षा असून, शालार्थ आयडी रखडल्यामुळे संबंधित शिक्षक जवळपास दोन वर्षांपासून वेतनापासून वंचित आहे. शालार्थ आयडी देण्याचा अधिकार आता विभागीय स्तरावर शिक्षण उपसंचालकांना देण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षकांचे प्रलंबित प्रस्ताव मार्गी लागतील, अशी आशा असताना याप्रक्रियेतील जाचक अटींचा समावेश करण्यात आल्याने अनेक शिक्षकांना अद्यापही शालार्थ आयडी मिळू शकलेला नाही. यात नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबारमधील माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या सुमारे ७०० हून अधिक शिक्षकांचा समावेश आहे.शालार्थ आयडीच्या फाइल प्रलंबित असून, शिक्षक हवालदिल झाले आहेत. या जाचक अटी व समकक्ष अधिकारी यांची नियुक्ती करून सर्व शिक्षकांना शालार्थ आयडी देण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिक्षकांसह मुख्याध्यापक संघातर्फे देण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासून पुणे येथे शालार्थ आयडीचे काम सुरू होते.हा आयडी मिळावा यासाठी नाशिकमधील शिक्षकांनी पुण्यात वारंवार फेऱ्याही मारल्या. जिल्हा मुख्याध्यापक संघासह शिक्षक संघटनांनी याबाबत पाठपुरावा करून आंदोलन करून शालार्थ आयडीचे अधिकार उर्वरित शिक्षण उपसंचालकांना देण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, अद्यापही शिक्षकांचा शालार्थचा प्रश्न सुटू शकलेला नाही.परंतु, हे अधिकार देताना शिक्षण विभागाने शालार्थ आयडी १ ते १५ मध्ये जाचक अटी घालून दिल्याने शालार्थ आयडीचे काम पूर्ण होण्यामधील अडचणी वाढल्या आहेत.त्यामुळे विविध शिक्षक संघटनांसह मुख्याध्यापक संघाने आक्रमक भूमिका घेतली असून, या अटी त्वरित रद्द करा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख, बी. डी. गांगुर्डे, मोहन चकोर, अनिल भोर, शौनक पाटील, रोशन पाटील यांनी दिले आहे.माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या मान्यताना शिक्षण उपसंचालकाकडून शालार्थ आयडी देण्यात येतो. उच्च माध्यमिकच्या शिक्षण उपसंचालकांनी दिलेल्या मान्यताना विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील हे शालार्थ आयडी देणार, असे सांगण्यात आले होते. याप्रक्रियेनंतर शिक्षक कर्मचाºयांचे पगार सुरू होणार असल्याने याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
७००हून अधिक शिक्षकांना शालार्थ आयडीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 12:55 AM