मनमाड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणात केवळ तीन दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असल्याने भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. १० जानेवारीला पालखेडचे रोटेशन मिळणे अपेक्षित असले तरी संभाव्य पाणीटंचाई पाहता ३१ डिसेंबरपर्यंत रोटेशन मिळावे यासाठी सोमवारी पालिका प्रशासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालयास कळवण्यात आले आहे. पाणीटंचाई पाचविला पुजलेल्या मनमाडकरांना गेल्या काही महिन्यांपूर्वी सात दिवसाआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. या पाणीपुरवठ्याच्या दिवसांमध्ये वाढ होत जाऊन तो कालावधी सोमवारी २० दिवसांपर्यंत जाऊन पोहचला आहे. सध्या पावसाअभावी शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पालिकेने खास बाब म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे १० जानेवारीला सोडण्यात येणारे पालखेडच्या पाण्याचे रोटेशन ३१ डिसेंबरपर्यंत सोडावे अशी विनंती केली आहे. याबाबत दोन दिवसात निर्णय न झाल्यास शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण होेणार आहे. या परिस्थितीमध्ये मनमाडकरांना पालखेडच्या रोटेशनची प्रतीक्षा आहे. सध्या वागदर्डी धरणातील मृतसाठ्यातून शहराला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. गढूळ व जंतुयुक्त पाणीपुरवठा होत असल्याच्या अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत. (वार्ताहर)
प्रतीक्षा पालखेडच्या रोटेशनची
By admin | Published: December 28, 2015 10:43 PM