पोलीस आयुक्तालयाकडून ८ जून रोजी काढलेले आदेश रद्द करत सोमवारपासून (दि. २८) नवे आदेश लागू करण्यात आल्याची अधिसूचना जारी केली. हे आदेश २७ जुलैपर्यंत कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या आदेशानुसार दिवसा जमावबंदी व संध्याकाळपासून पहाटेपर्यंत संचारबंदीची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगितले गेले आहे. तसेच ‘सील’ केलेल्या बाजारपेठेत खरेदीसाठी जाताना प्रवेश पास एन्ट्री पॉइंटवरून घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. याबाबतची उपाययोजना महापालिका प्रशासनाने करावयाची असल्याचे आदेशात पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी स्पष्ट केले आहे. पासची वेळ संपल्यानंतरही संबंधित ग्राहक बाजारात वावरताना आढळून आल्यास त्यास एक हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार असल्याचे त्या आदेशात म्हटले आहे. मात्र या आदेशानुसार कोणत्याही प्रकारची पासेसची वितरण व्यवस्था मनपाकडून तीन दिवसांनंतरही होऊ शकलेली नाही. त्यामुळे पोलिसांच्या आदेशाला मनपा प्रशासनाकडून वाटण्याच्या अक्षता लावल्याचे बोलले जात आहे.
---इन्पो---
‘सील’साठी पोलिसांची सज्जता
बाजारपेठा सील करण्यासाठी आणि एन्ट्री-एक्झिट पॉइंट तयार करण्याकरिता भद्रकाली, सरकारवाडा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मेनरोड, शालिमार, भद्रकाली, रविवार कारंजा, धुमाळ पॉइंट, वंदे मातरम चौक, नवापुरा या भागांत पोलिसांनी बॅरिकेडिंग आणून सज्ज ठेवले आहे. पासेस वितरण व्यवस्था मनपाकडून होणे अपेक्षित आहे, त्यानंतरच पोलिसांना ग्राहकांवर नियंत्रण ठेवता येणार आहे. मनपा-पोलीस प्रशासनातील असमन्वय यामुळे पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
----इन्फो---
मार्च महिन्यात पोलिसांनी बाजारांमध्ये प्रवेश करण्यासाठी सुरुवातीला ‘तिकीट’ आणि त्यानंतर ‘पावतीऐवजी कूपन’ सुरू केले. या दरम्यान, बाजारातील वर्दळ कमी करण्यात पोलिसांना यश आले. सुरुवातीलाच महापालिकेच्या पथकांसह पोलिसांनी तळ ठोकला. पण, यंदा पोलीस आयुक्तांनी आदेश काढल्यानंतर सज्जता कुठेही दिसली नाही. मंगळवारी (दि. २९) आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने बुधवारपासून (दि. ३०) मोफत पास देण्याची शक्यता होती. पोलिसांनी बॅरिकेडिंगदेखील केले; मात्र मनपाची कोणतीही व्यवस्था या ठिकाणी नसल्याने सकाळी पोलिसांचा फौजफाटा तैनात झाल्यावर काही वेळेत बंदोबस्तही पांगला. बाजारात कुठेही सोशल डिस्टन्स किंवा मास्कची खबरदारी दिसून आली नाही.
- -