नाशिकरोड : महापौर आपल्या दारी या उपक्रमांतर्गत प्रभाग १९ मध्ये आठ दिवसांपूर्वी पहिल्याच पाहणी दौºयात महापौर रंजना भानसी यांनी सिन्नरफाटा स्टेशनवाडी भागातील उघडा नाला साफ करण्याच्या दिलेल्या आदेशाला प्रशासनाकडून मात्र वाटाण्याच्या अक्षदा लावण्यात आल्या आहेत. पाहणी दौरा फक्त फार्स ठरल्याची रहिवाशांमध्ये चर्चा आहे. शहरामध्ये महापौर आपल्या दारी या उपक्रमाची सुरुवात आठ दिवसांपूर्वी प्रभाग १९ सिन्नरफाटा भागातून करण्यात आली. महापौर रंजना भानसी यांनी सिन्नरफाटा, स्टेशनवाडी साठेनगर येथील उघड्या तुंबलेल्या नाल्याची पाहणी केली होती. यावेळी महिला, रहिवाशांनी उघड्या नाल्याची दुर्गंधी, उपद्रव व त्यामुळे पसरत असलेले साथीचे रोग याबाबत तक्रार रंजना भानसी यांच्याकडे केल्या होत्या. त्यावेळी भानसी यांनी अशी अस्वच्छता असेल तर साथीच्या रोगाचा फैलाव कसा रोखता येईल, असा प्रश्न उपस्थित करत आरोग्य विभागाच्या अधिकाºयांना चांगलेच सुनावले होते. त्यानंतर भानसी यांनी स्टेशनवाडी साठेनगर येथील नाला स्वच्छ करून कीटकनाशक फवारणी करण्याचे आदेश दिले होते. महापौर आपल्या दारी या उपक्रमाला आठ दिवस उलटूनही अद्याप साठेनगर नाल्याची स्वच्छता झालेली नाही. प्रशासनाने एकप्रकारे महापौरांच्या स्वच्छतेच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले आहे. प्रभाग १९ व २२ मधील पाहणी दौरा हा नुसता फार्स ठरल्याची चर्चा आहे.
महापौरांच्या दौऱ्यानंतर कार्यवाहीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:19 AM