त्र्यंबकेश्वर : पावसाच्या प्रतीक्षेत मृगही जवळपास संपण्याच्या बेतात आहे. दररोज आकाशात ढग जमून येतात, परंतु पाऊसच येत नाही. रोहिणी बरसेल, वळवाचा पाऊस पडेल, पण रोहिणीही कोरडेच गेले. मृगदेखील सुरू झाले; पण पाऊस बरसला नाही. आता येत्या २१ तारखेला आर्द्रा नक्षत्रास सुरुवात होईल. पावसाच्या प्रतीक्षेची त्र्यंबककरांची मात्र जय्यत तयारी झाली आहे.दरवर्षी पाऊस पडला की २/३ पावसात अहल्या धरण भरले जायचे; कारण जवळ जवळ ४५ वर्षांपासून त्यातील गाळ काढलेला नव्हता. शहरवासीयांची धरणाची उंची वाढवण्याची मागणी होती. अखेर अहल्या धरणाचे भाग्य उजळले व गत महिनाभरापासून धरण स्वच्छ करण्याची मोहीम लोकसहभागातून हाती घेण्यात आली. नगराध्यक्ष विजया लढ्ढा यांचे पती दीपक लढ्ढा यांनी आपल्या पत्नीच्या माध्यमातून अहल्या धरणातील गाळ काढणे, धरणाची खोली वाढविणे आदि कामे करून घेतली. सांडवा दुरुस्त करून घेतला. ब्रह्मगिरीवर पावसाळ्यात पडणाऱ्या धबधब्यातून अहल्या नदीचा उगम होऊन सर्व पाणी अहल्या पाझर तलावात जमा होत असते.तलावाचे विशाल स्वरूप पाहता ‘अहल्या ल.पा. बंधारा’ असे त्र्यंबकवासीयांनी नाव दिले. माती-खडे-दगड आदि वाहून अहल्या धरण भरलेले होते. या बंधाऱ्याची क्षमता फक्त ६ द.ल.घ. फूट अशी होती. पूर्वी संपूर्ण गावाला पाणी पुरत असे. मात्र गाळाने भरल्याने पाणी पुरेनासे झाले. हे ओळखून जेथून अहल्येचा प्रवाह येतो त्या ठिकाणी आता दगडी बांध घालून माती दगड अडविण्यात आले. फक्त पाणी धरणात जमा होईल अशी तरतूद करण्यात आली. धरणाची क्षमताही वाढविण्यात पालिकेला यश आले आहे.धरण बांधल्यानंतर सन २००३ मध्ये तत्कालीन पाणीपुरवठा सभापती माधुरी गायधनी यांनी धरणातील गाळ काढला होता. त्यानंतर १४ वर्षांनी व धरण बांधल्यानंतर ४५ वर्षांनी मोठ्या प्रमाणात गाळ काढून सर्वांगीण दुरुस्ती करण्यात आली आहे. आता फक्त प्रतीक्षा आहे वरुणराजाच्या आगमनाची. (वार्ताहर)
त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाची प्रतीक्षा
By admin | Published: June 20, 2016 11:44 PM