नाशिक : जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेतील (डाएट) प्राचार्य, अधिव्याख्याते, अधिकारी, कर्मचारी यांचे फेब्रुवारीपासूनचे वेतन रखडले असून, नाशिक जिल्ह्यातील २७ जणांसह राज्यभरातील ८७० अधिव्याख्याता व कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षा आहे. कोरोना काळात अनियमित वेतनामुळे हे सर्व अधिकारी व कर्मचारी आर्थिक संकटात सापडले असून, शासनाने डाएट संस्थांमध्ये कार्यरत प्राचार्य, अधिव्याख्याता व कर्मचाऱ्यांचे वेतन तत्काळ करावे, अशी मागणी होत आहे.
नाशिक जिल्ह्यात डायटचे प्राचार्य, ४ ज्येष्ठ अधिव्याख्याता, ७ अधिव्याख्याता व १५ कर्मचारी अशा एकूण २७ नोकरदारांसह राज्यातील ‘डाएट’च्या एकूण ८७० नोकरदारांचे फेब्रुवारीपासूनचे वेतन झालेले नाही. या वेतन अनियमिततेमुळे प्रशिक्षणांसह शालेय शिक्षणाचा कणा असलेली ही यंत्रणाच मोडकळीस येण्याची भीती व्यक्त होत आहे. कोरोना संसर्गामुळे गेल्यावर्षी टाळेबंदी सुरू झाल्यापासून तब्बल सहा महिने रखडलेले ‘डाएट’च्या कर्मचाऱ्यांचे वेतन नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये एकत्रित देण्यात आले. हे वेतन जमा होताच बँकांनी गृहकर्ज, शैक्षणिक व वाहन कर्जांचे थकीत हप्ते एकत्रित कपात केल्याने अनेकांना दिवाळीच्या काळातही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतर पुन्हा फेब्रुवारीपासूनचे वेतन रखडले असून, ते अद्यापही जमा झालेले नाही. त्यामुळे ‘डाएट’चे कर्मचारी, अधिकारी यांच्यासह अधिव्याख्यात्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
इन्फो -
राज्यातील डाएट संस्थांवर गुणवत्ता विकासाची जबाबदारी आहे, याच संस्थांच्या कर्मचाऱ्यांना, अधिव्याख्यात्यांना वेतनाविना दिवस काढावे लागत असून, फेब्रुवारीपासूनचे वेतन अद्यापही मिळालेले नाही. विशेष म्हणजे प्रतिनियुक्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन होत असताना ‘डाएट’चे अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची खंत ‘डाएट’च्या एका ज्येष्ठ अधिव्याख्यात्याने व्यक्त केली.
--
पॉईंटर्स
राज्यात डाएट - ३३
अधिकारी - ३२०
शिक्षणेतर कर्मचारी - ५५०
एकूण - ८७०
-