नाशिक : महिला व बालकल्याण समिती सभापती अपर्णा वामन खोसकर यांना जिल्हा परिषद प्रशासनाने अत्यंत जुनाट वाहन उपलब्ध करून दिल्याने त्यांना तालुका भेटी अर्ध्यावरच सोडून परतण्याची वेळ आल्याचे चित्र आहे. त्यांच्यासह दोन पदाधिकाºयांना वाहने उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेने पाठविलेला प्रस्ताव विभागीय आयुक्तालयात महिन्याभरापासून पडून असल्याचे समजते.गेल्या काही दिवसांपूर्वी सभापती अपर्णा खोसकर पेठ तालुक्यातील अंगणवाड्यांची स्थिती पाहण्यासाठी दौºयावर गेल्या होत्या. मात्र त्यांना उपलब्ध करून दिलेले अॅम्बेसेडर वाहन (एम एच १५ अेअे २००५) करंजाळीला गेल्यानंतर अचानक बंद झाले. त्यामुळे त्यांना हे वाहन सुरू करण्यासाठी स्थानिकांची मदत घेऊन धावपळ करावी लागली. इकडून तिकडून वाहन कसेबसे सुरू करून त्यांना नाशिक गाठावे लागले. त्यानंतर त्यांनी तालुका भेटींसाठी नातलगांचे वाहन वापरले. त्यांच्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने वाहन उपलब्ध करून द्यावे, यासाठी दोन वाहनांच्या निर्लेखनाचे प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर केला आहे. गेल्या महिन्याभरापासून हे प्रस्ताव मंजुरीवरून रखडल्याचे समजते. सभापती अपर्णा खोसकर यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे दुरुस्त वाहनाची व्यवस्था करण्यासाठी विनंती केली की जिल्हा परिषद प्रशासन विभागीय आयुक्त कार्यालयाकडे प्रस्ताव प्रलंबित असल्याचे सांगून मोकळे होते. त्यामुळे सभापतींच्या तालुका दौरे व अंगणवाडी भेटींवर त्याचा परिणाम होत असल्याची चर्चा आहे.
महिला बालकल्याण सभापतींना वाहनाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 7:30 PM