नाशिकरोड : विहितगाव-वडनेर रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली असून, रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी वाहनधारक व रहिवाशांनी केली आहे. विहितगांव-वडनेररोड हा एकपदरी असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूला लागूनच शेती आहे. विहितगाव-वडनेर-पाथर्डीरोडने इंदिरानगर, पाथर्डी फाटामार्गे सातपूर, सिडको, नाशिक शहरात व मुंबई-आग्रा महामार्गाने कुठेही जाता येते. वडनेरगेट ते पाथर्डीफाटापर्यंत रस्ता रुंदीकरण करण्यात आल्याने वाहतुकीचा त्रास नसल्याने या मार्गावरील येणाऱ्या-जाणाºयांची संख्या वाढली आहे. मात्र वडनेर-विहितगाव रस्ता हा एकपदरीच असल्याने वाहतुकीसाठी छोटा पडतो. या ठिकाणी शेतातून ट्रॅक्टर, ट्रक, बैलगाडी आल्यास त्याला ओव्हरटेक करून जाणे अनेकवेळा अवघड होऊन जाते. समोरासमोरून दोन मोठी वाहने आली तरदोन्ही वाहनांना एक बाजू रस्त्याखाली उतरावे लागते. वाहतुकीची वर्दळ कमी, सिग्नल, स्पीड ब्रेकर नाही, सिडको, सातपूर, मुंबई-आग्रा महामार्गावर सहजरीत्या जाता येत असल्याने वाहतुकीची वर्दळ वाढू लागली आहे. नाशिक-पुणे महामार्गाने नाशिकला जाण्यासाठी अनेकजण विहितगाव-वडनेर मार्गाचा वापर करू लागले आहे.रहिवासी त्रस्त, वर्दळ वाढलीबाहेरगावी मुंबई-आग्रा महामार्गाने मालवाहतूक वाहने याच मार्गाचा जास्त वापर करत आहे. यामुळे विहितगाव-वडनेर एकपदवी रस्ता अत्यंत छोटा व अपुरा पडत आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी सातत्याने होत आहे. यामुळे रहिवासी, शेतकरी त्रस्त झाले आहेत. मनपा प्रशासनाने लक्ष घालून विहितगाव-वडनेर रस्त्याचे रूंदीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
विहितगाव-वडनेर रस्ता रूंदीकरणाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:32 AM