नाशिक : कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यातील सात औष्णिक वीज निर्मिती केंद्रांतील वीज निर्मिती कमी झाली असतानाच कोळशाअभावी एकलहरे येथील वीज निर्मितीही संकटात सापडली आहे. भुसावळ, खापरखेडा आणि परळी पाठोपाठ एकलहºयातही केवळ तीन दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक असल्याने वीज निर्मितीवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीज निर्मिती घटल्याने राज्यात सक्तीचे भारनियमन सुरू असून, अद्यापही पुरेसा कोळसा उपलब्ध होत नसल्याने वीज निर्मिती संकटात सापडली आहे. एकलहरे येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रात २१० मेगावॉटचे तीन संच आहेत, त्यापैकी दोन संच सुरू असून एक संच देखभाल दुरूस्तीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे.२१० मेगावॉटचे दोन संच सुरू असले तरी कोळशाअभावी या संचामधूनही कमी प्रमाणात वीज निर्मिती होत आहे. केंद्रात सध्या तीन दिवस पुरेल इतकाच कोळसा असून, केंद्राकडून मुख्यालयाकडे कोळशाची मागणी नोंदविण्यात आली आहे; मात्र कोळशाच्या उपलब्धतेबाबत मुख्यालयाकडून स्पष्ट कोणतेही कळविण्यात आले नसल्याने तीन दिवसाच्या आत कोळसा मिळू शकेल की नाही याविषयी एकलहरे केंद्रातीलच अधिकारी साशंक आहेत. कोळशाची मागणी नोंदविल्यानंतर मुख्यालयाने कोळसा पुरविण्याबाबत नियोजन केले जाईल असे म्हटले आहे; परंतु प्रत्यक्षात कधी आणि किती मिळेल, याचे उत्तर देण्याचे टाळले आहे. यापूर्वीच राज्यातील इतर सहा औष्णिक केंद्रांची मागणी असून, त्यातील तीन केंद्रांना तर दोन दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा आहे. त्यामुळे कोणत्या केंद्राला किती कोळसा मिळेल याची अनिश्चितता कायम आहे. वास्तविक किमान सात दिवस पुरेल इतका कोळसा शिल्लक असतानाच तत्पूर्वीच कोळशाची मागणी नोंदविणे अपेक्षित आहे. त्यानुसार संबंधित केंद्रांकडून मागणी नोंदवूनही कोळसा मिळू शकला नसल्याने साठा अवघ्या दोन ते तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. राज्यातील कोळशाची ही बिकट परिस्थिती पाहता काही औष्णिक केंद्र बंद होण्याची शक्यता आहे. नाशिकचे सध्या दोनच संच सुरू असून, या केंद्राला जर वेळेवर कोळसा पुरवठा झाला नाही तर दोन्ही संच बंद ठेवण्याची नामुष्की नाशिकवर येण्याची शक्यता आहे.
एकलहºयातील वीज निर्मिती संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:38 AM