नाशिक : व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेले जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांना मंगळवारची रात्र कार्यालयाच्या आवारातच जागून काढावी लागली. प्रमाणपत्रासाठी कार्यालयात चकरा मारूनही दाखला मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे पालकही संतप्त झाले आहेत. प्रमाणपत्र घेतल्याशिवाय जाणार नसल्याची भूमिका घेत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी कार्यालयाच्या आवारातच मुक्काम ठोकला. त्यामुळे जात पडताळणी कार्यालयाने रात्रभर कामकाज सुरू ठेवून बुधवारी पहाटे सहा वाजेपर्यंत १०६९ इतके दाखले वितरित केले.
नाशिक-पुणे रोडवरील नासर्डी पुलाजवळ जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय आहे. गेल्या आठवड्यापासून विद्यार्थी कार्यालयात चकरा मारत असून, कामकाजातील दिरंगाईमुळे दाखले वितरित करण्याचे प्रमाण कमी असल्याचे गर्दी वाढतच असल्याचे बोलले जात आहे. कमी मनुष्यबळ आणि अर्जांची मोठी संख्या, यामुळे येथील नियोजन पूर्णपणे कोलमडल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दाखले घेतल्याशिवाय जाणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतल्याने मंगळवारी दुपारपासून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता तंत्रशिक्षणांतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याकरिता मूळ जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सीईटी सेलने २० जानेवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे जात पडताळणी कार्यालयात विद्यार्थ्यांच्या रांगा लागलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी पडताळणी प्रमाणपत्रासाठी अनेकदा कागदपत्रांची पूर्तता करूनही वेळेवर दाखला मिळालेला नसल्याने त्यांना कार्यालयात धाव घ्यावी लागली. ऑनलाइन प्रक्रियेत पडताळणी कार्यालयाकहनू प्रकरण पुढे सरकत नसल्याने विद्यार्थ्यांना थेट कार्यालयात यावे लागले. गेल्या आठवडाभरापासून कार्यालयात विद्यार्थ्यांची दाखले मिळविण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.
अर्ज सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दाखल्यांमध्ये त्रुटी काढल्या जात असल्याने अगोदरच पडताळणीसाठी विलंब होत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. २० तारीख अंतिम असल्याने पडताळणी कार्यालयाने देखील विद्यार्थ्यांना वेळेत दाखले देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, विद्यार्थ्यांचा लोंढा मोठा असल्याने सातत्याने प्रक्रिया राबवूनही दाखले वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता कमीच असल्याचे विद्यार्थ्यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.
--इन्फो---
रात्रभर कार्यालय सुरू
संतप्त झालेल्या विद्यार्थी आणि पालकांनी कार्यालय आवारातच ठाण मांडल्यामुळे मंगळवारपासून रात्रभर कार्यालय सुरू ठेवण्यात आले. बुधवारी पहाटे सहा वाजेपर्यंत १०६९ इतके पडताळणी प्रमाणपत्रे थेट देण्यात आली. सायंकाळी सहानंतर काही काळ विश्रांती घेत सकाळी १० वाजेपासून पुन्हा कामकाज सुरू केले.
--इन्फो--
प्रक्रिया आता ऑफलाइन
व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांकडे जात पडताळणीचे प्रमाणपत्र मागण्यात आल्याने अशा विद्यार्थ्यांनी थेट जात पडताळणी कार्यालयात धाव घेतली. त्यामुळे अगोदरच प्रलंबित प्रकरणे आणि ऐनवेळी झालेली गर्दी, यामुळे कार्यालयात एकच गोंधळ उडाला. इमारतीच्या तिन्ही मजल्यांवर मुलांच्या ऑफलाइन अर्ज दाखल करण्यासाठी रांग लावलेली होती. त्यांचे अर्ज ऑफलाइन पडताळणी करून लागलीच त्यांच्या प्रकरणांना मंजुरी देण्याची प्रक्रिया बुधवारी राबविण्यात आली. त्यामुळे कागदपत्रे तपासणीनंतर अवघ्या दीड ते दोन तासांत अनेक विद्यार्थ्यांच्या हाती पडताळणी प्रमाणपत्रे पडली.
--इन्फो--
मुख्य लिपिक रजेवर गेल्याने इतर कर्मचाऱ्यांची मदत
जात पडताळणी कार्यालयात केवळ अधिकारी हेच शासकीय कर्मचारी असून, उर्वरित स्टाफ हा आउटसोर्सिंग केलेला आहे. पडताळणीचे कामकाज पाहणारा एकमेव शासकीय कर्मचारी रजेवर गेल्याने यंत्रणेवर ताण आला असल्याची चर्चा आहे. जात पडताळणीची गर्दी वाढलेली असतानाही संबंधित कर्मचारी रजेवर गेल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.