नाशिक : कलारंग मैफलीत गायिका प्रांजली बिरारी- नेवासकर यांनी सादर केलेल्या वैविध्यपूर्ण गीतांनी पावसाळी सायंकाळ सूरमय झाली. प्रत्येक गाण्याची रचना आणि संगीताचा भिन्न बाज, यामुळे संपूर्ण मैफल जणू सुरांच्या चांदण्यात न्हाऊन निघाली. मैफलीची सुरुवात प्रांजली हिने ‘जरासी आहट होती है’ या गाण्याने करत, जणू संपूर्ण मैफलीचा ताबा घेतला. कलाकाराचे आयुष्य जसं त्याच्या कलेने व्यापून टाकलेलं असतं, तसंच संगीतकाराचं, गायकाचं आयुष्य सप्तसुरांनी, लयीने आणि शब्दांनी व्यापलेलं असतं, हे सांगतांनाच ‘सप्त स्वरांनो, लय शब्दांनो’ ही रचना प्रांजलीने सादर केली. पाऊस पडल्यावर सृष्टी बहरते आणि आपल्या प्रिय व्यक्तीची आठवण होते, हाच भाव ‘सुनो सजना पपीहे नेे’ या गाण्यातून सादर करीत घातलेली प्रेयसीच्या मनातील आर्त साद रसिकांच्या मनाला भिडली. ‘श्रावणाचं ऊन मला झेपेना’ अशी लाडीक तक्रार करणारं गीत प्रांजलीने सादर केले. आजूबाजूच्या परिस्थितीचे वास्तव दाखवणारं आणि आपल्या मनातली भीती समर्पक शब्दात पोहोचविणारं ‘भय इथले संपत नाही’ या गाण्यापाठोपाठ ’देखिला गे माये’ ही रचना सादर करून, प्रांजलीने रसिकांची वाहवा मिळविली. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ हा अभंग गाऊन तिने सगळ्यांचीच मने जिंकली. ‘चांदण्यात फिरताना’ या गाण्याने मैफिलीचा संस्मरणीय समारोप झाला. भिन्न भिन्न प्रकृतीच्या गाण्यांना प्रांजलीने सहजतेने पेलल्याने लय, शब्द, ताल, सूर आणि गायकी अशा सर्व अंगांनी ही जनस्थान कलारंग मैफल रसिकांच्या मनात घर करून गेली.
फोटो
११प्रांजली