नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून झालेला वादळी वारा आणि पावसामुळे देवळा तालुक्यातील सावकी येथे मातीच्या घराची भिंत कोसळून पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीररित्या जखमी झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. १६) घडली आहे. सावकी येथील सोनवणे कुटुंबीय गाढ झोपेत असतांना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आदिवासी वस्तीत राहणाऱ्या पठाण कचरू सोनवणे यांचे मातीचे घर आहे. गाढ झोपेत असलेले सोनवणे, पत्नी सुनीता सोनवणे, त्यांचा पाच वर्षीय मुलगा आकाश सोनवणे व सात वर्षीय मुलगा कुणाल सोनवणे यांच्या अंगावर गुरुवारी (दि. १५) भिंत कोसळली. आजूबाजूच्या ग्रामस्थांनी ढिगाऱ्याखाली दबलेल्या सर्वांना बाहेर काढले. यामध्ये तिघांना गंभीर इजा झाल्याने रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना पाच वर्षीय आकाश या चिमुकल्याचा रस्त्यात मृत्यू झाला, तर सुनीता पठाण सोनवणे (२७) व कुणाल पठाण सोनवणे (७) हे दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पठाण सोनवणे (२९) याला किरकोळ दुखापत झाली आहे.
घराची भिंत कोसळून चिमुकल्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 4:33 PM