खर्डे : वडाळा (वाजगाव) ता.देवळा या गावाच्या शिवारातील पिकांत रानडुकरांनी धुमाकूळ घातल्याने पिकांचे नुकसान होत आहे. आधीच कमी पावसात पिके जगवण्याची धडपड करणाऱ्या शेतक-यांवर संकट येवून पडल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती झाली आहे. वनविभागाने या रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकºयांनी वनविभागाकडे निवेदनाद्वारे केली. वडाळाच्या डोंगराकडील भागात तसेच आजूबाजूच्या शिवारात रानडुकरांकडून खरीप हंगामातील पिकांचा फडशा पाडला जात आहे. या रानडुकरांचे कळप रोज रात्री शेतात घुसून मका, भुईमूग, पावश्या मुग व इतर पिके उकरून फस्त करत असल्याने लाखो रु पयांचे नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. रानडुकरांच्या उच्छादामुळे वर्षाचे पीक हातातून गेले आहे. रात्री पिकांची राखण करण्यासाठी काही शेतकरी व त्यांची गडीमाणसे जागता पहारा ठेवत असले तरी त्याचा फारसा उपयोग होतांना दिसत नाही. कारण या रानडुकरांना हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास ते अंगावर धावतात. त्यामुळे वनविभागाने या रानडुकरांचा तातडीने बंदोबस्त करावा व झालेल्या नुकसानीचे पंचनामे व्हावेत अशी मागणी या परिसरातील नामदेवराव सोनवणे व इतर शेतक-यांनी केली आहे.
रानडुकरांचा धुमाकुळ, पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 1:07 PM