सिडको : उंटवाडी परिसरात कालिका गार्डनजवळ रस्त्यातच सुमारे १५ ते २० गायी व भटकी कुत्री ठाण मांडत असल्याने रस्ता अडवला जात आहे. परिसरात दोन-तीन दिवसांपासून अनेक पथदीप दिवसा सुरू तर रात्री बंद राहत असल्याने रात्री अंधाराचा सामना करावा लागत आहे.उंटवाडी, तिडकेनगर परिसरातून शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर गार्डन व शाळेजवळ १५ ते २० गायी व कुत्री रस्त्यावरच ठाण मांडत असल्याने पादचारी व वाहनचालकांना जीव मुठीत धरूनच चालावे लागते. या परिसरात तीन शाळा असून, भाजीपाला मार्केटही आहे. त्यामुळे दिवसभर रस्त्यावर वर्दळ असते. मात्र अशा वर्दळीच्या ठिकाणी वर्षानुवर्ष भटक्या गायी व कुत्र्यांची समस्या आहे. मात्र संबंधित विभागाने कधीच दखल घेत नाही. परिसरातील लोकप्रतिनिधींचा तर कधीच परिसरात संपर्क नसतो. गेल्या तीन-चार दिवसांपासून कालिका पार्क, श्रीराम रो-हाऊस, साईराम रो-हाऊस, तिडकेनगर आदि परिसरातील पथदीप बरेचसे बंदच आहेत; परंतु जे सुरू आहेत तेही सकाळी सुरू असतात व रात्रीच्या वेळी बंद असतात. त्यामुळे परिसरात भुरट्या चोऱ्यांचाही होत आहेत. तरी संबंधित विभागाने याची दखल घेऊन भटक्या गायी व कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या अचानक वाढली आहे.
उंटवाडीत भटक्या गायींचा उच्छाद
By admin | Published: July 21, 2016 9:46 PM