मनोज देवरे कळवणशासनाच्या कागदावर कळवण हा सुजलाम सुफलाम आणि विविधतेने नटलेला संपन्न व सधन तालुका आहे. परंतु वास्तव मात्र वेगळेच आहे. ज्या आदिवासी बांधवांनी तालुक्यात जलाशयाचे प्रकल्प व्हावेत म्हणून आपल्या जमिनी दिल्या त्या आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याचे विदारक चित्र आहे. पाण्यासाठी शासकीय यंत्रणेचे उंबरठे झिजवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.तालुक्याच्या आदिवासी भागातील अनेक गावांना पिण्यासाठी पाणी नाही. गावातील पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी कोरड्या पडल्याने पाण्यासाठी भटकण्याची वेळ या भागातील ग्रामस्थांवर आली आहे. दुष्काळाच्या झळा अल्प असल्याने शासकीय व प्रशासकीय यंत्रणेच्या कागदावर कळवण हा तालुका इतर टंचाईग्रस्त तालुक्यांच्या तुलनेत बरी परिस्थिती असलेला आहे. मात्र पुनंद आणि ओतूर खोऱ्यातील डोंगरकपारीतील आदिवासी वस्ती-पाडे व गाव-वस्तींना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या ग्रामपंचायतींच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत; परंतु विहीर तसेच विंधनविहिरींना पाणी नाही.
दुग्धव्यवसायावरदेखील परिणामतालुक्यातील दुग्धव्यवसायावर यंदाच्या दुष्काळाची वक्र दृष्टी पडलेली दिसून येत आहे. अल्प प्रमाणात झालेल्या पावसामुळे परिसरातील नदी, नाले, कोल्हापूर टाइप बंधारे कोरडे पडण्यास सुरु वात झाली आहे. अपुऱ्या पाण्यामुळे पिकावर अनिष्ठ परिणाम झाला असून, चाराटंचाई निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीचा परिणाम पशुपालन व त्यावर अवलंबून असलेल्या दुग्धव्यवसायावरही झालेला दिसून येतो. दुग्धव्यवसाय मंदीत आला असून, परिणामी बाजारात दुधाचे भाव वाढले आहेत. कमी पाण्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, त्यापासून मिळणाऱ्या चाऱ्याचा तुटवडा भासत आहे. परिसरातील काही भागात जनावरांना पिण्यासाठी पाणीदेखील उपलब्ध नाही, अशी भयावह स्थिती निर्माण झाली आहे.नागरिकांनी करायचे काय?४शासनाने गिरणा नदीवरील ब्रिटिशकालीन बंधाऱ्यांच्या दुरु स्तीबरोबर बंधारे बांधले तर भविष्यातील पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल. भरपूर पाऊस पडायचा, गिरणा, बेहडी, पुनंद नदी वाहायची. काळ लोटला, लोकसंख्या वाढली, गरजेनुसार पाणीयोजना झाल्या आणि नवीन धरणे व प्रकल्पही झाले. आता बारमाही नुकसानीचे प्रमाण कमी झाले असले तरी पावसाळ्यातील पर्जन्यमान कमी झाले. नदीला पूर येत नाही. चणकापूर, अर्जुनसागर (पुनंद) प्रकल्प तसेच लहान- मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले की मग नदीत पाणी सोडले जाते. आज पाणीटंचाई निर्माण झाली तर कळवण तालुक्यातील जनतेला पाणी असून मिळणे दुरापास्त झाले आहे. कारण पाण्यावर अधिकार कळवणकर जनतेऐवजी मालेगावकरांचा असल्याने पाणीटंचाई निर्माण झाली तर कळवण तालुक्यातील जनतेने करायचे काय, असा प्रश्न निर्माण होणार आहे.