वणी : राज्यात युती सरकार गेले, महाविकास आघाडीचे सरकार आले. कालचे विरोधक सत्ताधारी बनले. ज्या विरोधकांनी कालपर्यंत समस्यांप्रकरणी आवाज उठवला ते सत्तेत बसूनही अद्याप वणी बसस्थानक ते महाविद्यालयापर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्तीला मुहूर्त लाभला नाही. वणीतील या रस्त्याचे नशीब फुटकेच निघाले. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालकांसह पादचारी मात्र आपल्याच नशिबाला दोष देत मुकाटपणे मार्गक्रमण करताना दिसून येत आहेत.वणी बसस्थानक परिसर ते महाविद्यालयपर्यंतचा रस्ता अजूनही दुरु स्तीच्या प्रतीक्षेत आहे. सुमारे दोनशे मिटर अंतराचा हा रस्ता असून ठिकठिकाणी खड्डे, धुळीचे साम्राज्य, असमान रस्ता यामुळे वाहने आदळणे, दणके बसणे, अपघात होणे, वाहने घसरणे अशा प्रकारांना सामोरे जावे लागत आहे. वाहनांबरोबर वाहनचालक व प्रवासी यांची आर्थिक व शारीरीक हानीही यामुळे होत आहे. या रस्त्याची दुरु स्ती व डागडुजी होण्यासाठी खासदार भारती पवार व आमदार नरहरी झिरवाळ यांना साकडे घालण्यात आले होते. आमदार झिरवाळ यांनी रस्ता सुस्थितीत व्हावा याकरीता आॅगस्ट २०१९ मध्ये रास्ता रोको आंदोलन केले होते. विद्यमान उपसरपंच मनोज शर्मा वणी मर्चंट बँकेचे तात्कालीन अध्यक्ष व माजी उपसरपंचांसह काही ग्रामपंचायत सदस्य व नागरीक हे त्यात सहभागी झाले होते. युतीच्या सरकारच्या कालावधीत हे आंदोलन झाले, आता महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यामुळे या रस्त्याचे नशिब फळफळेल याची प्रतीक्षा होत असतानाच सदरच्या रस्त्याचा भाग राज्य मार्गातून राष्ट्रीय महामार्गात परावर्तीत होणार असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला त्याचे आयतेच निमित्त सापडले. परिणामी या खात्याकडून आता जबाबदारी झटकली जात आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम कासवगतीने सुरु आहे . त्यामुळे या रस्त्याच्या कामाला कधी मुहूर्त लाभेल याबाबत अनिश्चितता आहे. मात्र तोपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी होत आहे.
वणीतील रस्त्याचे नशिबच फुटके!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 4:08 PM
युती गेली, आघाडी आली : दुरुस्तीला लागेना मुहूर्त
ठळक मुद्देआमदार झिरवाळ यांनी रस्ता सुस्थितीत व्हावा याकरीता आॅगस्ट २०१९ मध्ये रास्ता रोको आंदोलन केले होते.