प्रभाग समिती सभापती शीतल माळोदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत २४ लाख रुपयांच्या कामांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. पंचवटी विभागात काही दिवसांपासून मोकाट डुकरांचा उपद्रव वाढलेला आहे. तसेच काही भागात स्वच्छता कर्मचारी नियमितपणे येत नाहीत, असा आरोप बैठकीत नगरसेवकांनी केला. विडी कामगार नगर ते आडगाव भागात जॉगिंग ट्रॅकचे काम सुरू केले असले तरी सध्या काम बंद असल्याने सदर काम वेळेत पूर्ण करण्यासाठी मनपाने दखल घ्यावी, असे उद्धव निमसे यांनी सांगितले. तर स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून दोन शिफ्टमध्ये काम करून घेण्याची सूचना पूनम मोगरे यांनी केली. यावेळी झालेल्या बैठकीत उपमहापौर भिकूबाई बागूल, पूनम मोगरे, रुची कुंभारकर, उध्दव निमसे, सुरेश खेताडे, बांधकाम विभागाचे समीर रकटे, विद्युत विभागाचे अनिल गायकवाड, उद्यान विभागाचे वसंत ढुमसे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संजय दराडे, यांनी सहभाग घेतला होता. विभागीय अधिकारी विवेक धांडे यांनी उपस्थित पाणीपुरवठा, बांधकाम, उद्यान, आरोग्य विभागाच्या उपस्थित अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून प्रभागातील नगरसेवकांनी सुचविलेल्या कामाची त्वरित दखल घेण्याबाबत सूचना दिल्या.
मोकाट डुकरांवर प्रभाग सभापती गाजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 4:14 AM