२०१७मध्ये महापालिकेची सहाव्या पंचवार्षिक कारकिर्दीसाठी निवडणूक झाली होती. केवळ नाशिकच नव्हे तर मुंबई, ठाणे, पुणेसारख्या दहा महापालिकांच्या निवडणुका एकाच वेळी होत असतात. त्यामुळे या सर्वच महापालिका ताब्यात घेण्यासाठी राजकीय प्रतिष्ठापणाला लागते. आता या महापालिकांच्या निवडणुका २०२२मध्ये होऊ घातल्या आहेत. मात्र, गेल्यावर्षी अचानक कोरोना संकट उद्भवले. नोव्हेंबरअखेरीस संकट कमी झाले आणि मार्च- एप्रिलमध्ये दुसरी लाट आली. त्यामुळे अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक नियुक्तीची वेळ आली आहे. दरम्यानच्या काळात कोरोनामुळे आताही या दहा महापालिकांच्या निवडणुका होतील किंवा नाही याबाबत शंका आहे. परंतु गेल्या सोमवारी (दि.३१) केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगात वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली आहे. त्यानुसार आता निवडणूक आयोग तयारी करण्याबाबत लवकरच आदेश येण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
२०२२मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी २०११ मध्ये झालेल्या जनगणनेचा आधार धरण्यात येणार आहे. आणि त्यानुसार प्रभागरचना करण्यात येणार आहे. मात्र, एकसदस्यीय प्रभाग की बहुसदस्यीय याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एक सदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार प्रशासनाने काम करण्याची तयारी सुरू केली आहे.
इन्फो...
सध्याची चार सदस्य प्रभाग सदस्यीय प्रभाग पद्धती आहे. ही भाजपला अधिक फायदेशीर ठरल्याचे निमित्त करून ती रद्द करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. आता एक-दोन किंवा तीन सदस्यीय पद्धतीचा वापर केला तरी संपूर्ण प्रभागरचना बदलली जाणार आहे.
इन्फो...
आरक्षणाचा परिणाम होणार
अन्य मागासवर्गीय प्रवर्गाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण संपुष्टात आणण्यात आले आहे. त्यामुळे आता खुल्या जागा वाढण्याची शक्यता आहे. या निवडणुका फेब्रुवारी महिन्यात होण्याचा अंदाज बांधला जात आहे.