लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : वारकरी संप्रदायाच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच राज्यात कोरोनाचे संकट असल्यामुळे वारकरी आणि विठ्ठल भक्त पंढरपूरला जाऊ शकणार नाही, या महामारीच्या संकटात सर्वांत मोठा भक्तीसोहळा होणार नाही. याची सर्वांना खंत वाटते. परंतु पर्यावरण जनजागृती करीत आपल्या गावापासून फक्त पुढच्या एका गावापर्यंत झाडे लावून त्याच्या संवर्धनाचा संकल्प करीत वारीचा सोहळ्याचा आनंद मिळवून देऊ शकतो, असा विश्वास व्यक्त करीत या संकल्पाची अंमलबजावणी करण्याचा ध्यास ग्रीन रिव्होल्युशन या पर्यावरण जनजागृती संस्थेचे कार्यकर्त्यांनी घेतला आहे.आपल्या गावात राहून वारकरी मंडळी वारीचे जे मार्ग आहेत, ते हिरवळीने सजवू शकतात. तसेच विठूरायाच्या मंदिरापर्यंत एकप्रकारे निसर्ग संवर्धन शकतात. आपापल्या गावी राहून हे शक्य आहे, असे मत ग्रीन रिवोलूशन या पर्यावरण जनजागृती संस्थेचे डॉ. संदीप अहिरे यांनी व्यक्त केले. यासंबंधी माहिती देताना त्यांनी सांगितले की, पंढरपूरकडे जाताना पहिले जे गाव लागेल तिथपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वारकरी बंधूंनी झाडे लावत जायचे, त्यानंतर तेथून पुढे त्या गावच्या वारकऱ्यांनी झाडे लावत पुढील गाव येईपर्यंत झाडे लावणार आहेत.विशेष म्हणजे झाडे लावताना फक्त देशी झाडे लावायचे वड, पिंपळ, उंबर, निम, आंबा, पळस, कदंब, वृक्षदिंडीचा सोहळा पार पाडण्यासाठी, नेहमीच्या वारीचे रस्ते हिरवळीने सजवण्यासाठी ही एक प्रकारे मोठी संधी मिळाली आहे. कारण निसर्गपूजा ही एक ईश्वरपूजा आहे. तुकाराम महाराज यांच्या अभंगाप्रमाणे ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’, असे म्हणत, या अनोख्या सोहळ्याची तयारी सुरू आहे.