सातपूर : भविष्यात सेवाव्रती कीर्तनकार तयार व्हावेत, उत्कृष्ट गायक-वादक वारकरी घडावेत, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्त तरुणपिढी घडावी, या तरुण पिढीकडून कुटुंबव्यवस्था टिकावी आणि देशप्रेम जागृत व्हावे, या उद्देशाने अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने ‘गाव तेथे वारकरी फलक’ हा संकल्प सोडण्यात आला आहे. या संकल्पनेची सुरुवात नाशिक जिल्ह्यापासून करण्यात आली आहे. ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळणारे अण्णासाहेब महाराज अहेर (हिसवळकर) यांच्या कल्पनेतून हा उपक्रम आकार घेत आहे. ‘गाव तेथे वारकरी फलक’ या उपक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यातील नाशिक, सिन्नर, येवला, चांदवड, मालेगाव, पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, नांदगाव, कळवण, देवळा, सुरगाणा या तालुक्यांसह शहरातील नाशिकरोड, सिडको, सातपूर, पंचवटी, मध्य नाशिक आदी ठिकाणी वारकरी फलकाचे अनावरण करण्यात आले आहे. जवळपास जिल्ह्यातील ८० गावांमध्ये फलकाचे अनावरण झाले आहे. ही संकल्पना अन्य जिल्ह्यातही राबविण्यात येणार आहे.विस्कटलेला वारकरी समाज एकसंघ व्हावा याकरिता त्यांनी वारकरी मेळावे, बैठका, हितगूज सभा घेऊन त्यांच्यामध्ये स्नेह वाढविला. प्रकाश महाराज बोधले यांचे संकल्पनेतून महाराष्ट्रभर सुरू झालेला ‘गाव तेथे वारकरी फलक’ या उपक्रमाला मूर्त स्वरूप देण्याचे काम अहेर महाराज करीत आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील प्रत्येक गावात ‘गाव तेथे वारकरी’ उपक्रम यशस्वी होत आहे. या माध्यमातून वारकरी भाविकांच्या समस्या व विचार जाणून घेतल्या जात आहे. जिल्हा परिषद कर्मचारी बाळासाहेब साबळे यांच्या सहकार्यातून आकाशवाणी व ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ या कार्यक्रमात दूरदर्शनवर अहेर महाराज यांची कीर्तन सेवा गाजलेली आहे. लहानपणी आळंदी येथे जयराम महाराज भोसले यांच्या मार्गदर्शन व सहवासातून संस्कार झाले. वै.जगन्नाथ महाराज पवार, एकनाथ महाराज चव्हाण, आचार्य रामकृष्णदास महाराज लहवीतकर, माधव महाराज घुले यांना अहेर महाराज आदर्श मानतात. अण्णासाहेब महाराज अहेर हे कीर्तन प्रवचनाची फी ठरवत नाही, जे मिळाले त्यावर समाधान मानतात. आतापर्यंत त्यांनी हजारो लोकांना व्यसनमुक्त केले आहे. अंधश्रद्धा, कौटुंबिक कलह, वाद मिटविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. त्यांनी आजपर्यंत अनेक गांवामध्ये हरिपाठ, भजन, सप्ताह सुरू करून आचार, विचार, प्रचार व प्रसार यातून वारकरी एकत्र करून संघटनवृद्धी व जनजागृती केली आहे. अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने नाशिकबाहेर देहू आळंदीबरोबरच दिल्ली येथील रामलीला येथेही हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात पुढाकार घेतला आहे.अण्णासाहेब महाराज अहेर यांचे कार्यगेल्या ३८ वर्षांपासून निष्काम भावनेने वारकरी पंथासाठी काम करणारे सेवाव्रती व्यक्तीमत्व असलेले अहेर महाराज यांनी वारकरी पंथाच्या प्रचार व प्रसारासाठी स्वत:ला वाहून घेतले आहे. त्यांची तळमळ व सेवाभावी परमार्थ पाहून अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले (डिकसळकर) यांनी दि.८ जुलै २०१६ रोजी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. अहेर महाराज यांनी याकरिता संपूर्ण जिल्हा पिंजून काढला आहे.
वारकरी मंडळाचा ‘गाव तेथे वारकरी फलक’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:01 AM