नाशिक : नाशिक - पुणे महामार्गावरील शिंदे टोल नाका येथील असुविधा दूर कराव्यात अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नाशिक ट्रान्सपोर्ट संघटनांकडून देण्यात आला आहे.
नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड व नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष पी. एम. सैनी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना याविषयी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक - पुणे मार्गावर असलेल्या शिंदे टोल नाक्यावर फास्ट टॅगमध्ये तांत्रिक अडचणी असल्याने येथे तैनात असलेले कर्मचारी व त्यांचे काही वरिष्ठ गाडीचे परमिट, मालाचे पेपर, लायसन्स घेतात आणि ड्रायव्हरला दमबाजी करतात. याबद्दल काही विचारले तर टोल व्यवस्थापनाने आम्हाला तसे सांगितले आहे, असे उत्तर देतात. याबाबत विचारणा करण्यास गेल्यानंतर येथील प्रशासनाकडून दादागिरीची भाषा केली जाते. तसेच काही दिवसांपूर्वी येथील कर्मचाऱ्यांनी चालकांना मारहाण केल्याचे प्रकारही घडले आहेत. शिंदे टोल प्लाझा येथे स्वछतागृहांची देखील गैरसोय आहे. चालकांना थांबण्यासाठी तसेच फ्रेश होण्याची कुठलीही व्यवस्था नाही. तसेच रुग्णवाहिकेचीदेखील सोय नाही. नाशिक ते सिन्नर दरम्यान मोह गावाजवळ रस्त्यात नेहमी खड्डे असतात. त्यामुळे अपघात होतात. शासनाने ठरवून दिलेल्या नियमावली पायदळी तुडविण्याचे काम या टोल प्रशासनाकडून होत आहे. याठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आलेली विजेची व्यवस्था पूर्णपणे बंद असून, अपघातांचे प्रमाणदेखील वाढले आहे. येथील टोल प्रशासनाला याबाबत आदेश देण्यात येऊन येथील प्रश्न मार्गी लावण्यात यावेत अन्यथा वाहतूकदार संघटनांना येथे आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही, असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, टोल व्यवस्थापक यांना देण्यात आल्या आहेत.