शेवगे दारणा येथील ग्रामसेवक शाम कदम हे आपल्या कार्यात कसूर करत असून, गेल्या तीन वर्षात गावाच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी कोणत्याही प्रकारचे शासकीय कामकाज न केल्याने त्यांच्या विरोधात सरपंचांसह ६ ग्रामपंचायत सदस्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून देखील कारवाई होत नसल्याने ग्रामपंचायतीसह ग्रामस्थ हैराण झाले आहेत. मागील तीन वर्षापासून शेवगे दारणा येथे रुजू असलेले ग्रामसेवक कदम यांनी ग्रामपंचायत कर वसुली, ऑनलाईन कारभार, आरक्षित खर्च, वैद्यकीय सुविधा, दिव्यांग योजना लाभार्थ्यांची अडवणूक असे विविध प्रकारचे कामे केले नसल्याची तक्रार सरपंच पुष्पा कासार, मीना कासार, दीपक कासार, दामिनी कासार, हिराबाई कासार, सविता कासार आदी ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे. ग्रामसेवकास शासकीय कामाबाबत विचारणा केली असता पोलिस केस करण्याबाबत दम देतात असेही तक्रारीत म्हटले आहे.
जिल्हा परिषद पाच टक्के अपंग खर्चाचे प्रस्ताव सादर करण्यासाठी संबंधितांकडून २ हजार रुपयाची मागणी करण्याबरोबर एकूण १२ दिव्यांग योजनेच्या लाभार्थीना लाभ दिलेला नाही, ग्रामपंचायत विकास कामाचे कोणत्याही प्रकारचे बिल अदा करीत नाही. महिन्यातून चार पाच दिवस कामावर येत असल्याने गावाचा विकास रखडला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.