नाशिक : शिवसेना, मनसे यांसारख्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते स्वत:ला ‘भाई’ म्हणून मिरवित असल्याची बाब पोलिसांच्या लक्षात आली होती. ‘भार्इं’च्या संशयास्पद हालचालींवर ‘वॉच’ ठेवत अंबड व सातपूरमधील अभय पवार, योगेश गांगुर्डे यांची पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी सखोल चौकशी करत ‘वॉर्निंग’ दिली आहे.शिवसेनेचा सिडको भागातील कार्यकर्ता अभय पवार व मनसेचा सातपूर भागातील कार्यकर्ता योगेश गांगुर्डे हे दोघे अंगावर सोने घालत बाउन्सरच्या गराड्यात परिसरात मिरवित होते. नागरिकांमध्ये भीती निर्माण व्हावी आणि आपला वचक बसावा, या हेतूने लक्ष वेधून घेण्यासाठी बाउन्सरच्या गराड्यात हे दोघे ‘पुढारी’ वावरत असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली होती. त्यानंतर धिवरे यांनी या दोघांना अंबड, सातपूर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावले होते. तब्बल पाच ते सहा तास चौकशी केल्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी योग्य वर्तणुकीची समज दिली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी तसेच परिसरात संशयास्पद हालचाली थांबविण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. बाउन्सरच्या गराड्यात वावरू नये, असा स्पष्ट इशारा या दोघांना देण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा दम पोलिसांनी भरला आहे. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे धाबे दणाणले आहे. सुरक्षारक्षक नियमांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही, अन्यथा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे धिवरे यांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांनी खाकी शैलीत पवार व गांगुर्डे यांना ‘समज’ देत समाजात सभ्यतेने वागण्याचा अंतिम इशारा दिला आहे. यानंतर कुठल्याही प्रकारची संशयास्पद वागणूक दिसून आल्यास पोलीस कुठल्याही राजकीय पक्षाचा किंवा नेत्यांचा विचार न करता थेट कारवाई करणार असल्याचा संदेश चौकशीतून पोलिसांनी अप्रत्यक्षपणे दिला आहे.
बाउन्सरचा देखावा नको राजकीय कार्यकर्त्यांना ‘वॉर्निंग’
By admin | Published: August 01, 2016 12:53 AM