सिन्नर : तालुक्यातील वडांगळी येथील आरोग्य उपकेंद्राचे काम जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत उपकेंद्रस्तरावर इमारत बळकटीकरणासाठी सुमारे सात लाख रूपये निधी खर्च करण्यात येत आहे. मात्र वर्षभरापूर्वी दुरूस्ती होऊनदेखील पुन्हा त्याच कामांवर दुरूस्तीचा खर्च केला जात असल्याने सरपंच योगेश घोटेकर यांनी आरोग्य अधिकाऱ्यांसह उपकेंद्रात पाहणी केल्यावर सदरचा प्रकार समोर आला आहे.
वडांगळी येथील आरोग्य उपकेंद्रांची वर्षभरापूर्वी सुमारे साडेचार लाख रूपये इतका निधी खर्चून दुरूस्ती करण्यात आलेली होती. मुळात ही इमारत निर्लेखित करून नवीन टाइप प्लॅन नुसार इमारत बांधण्यात यावी असा ठराव ग्रामसभेवर घेऊन ग्रामपंचायत मार्फत करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात केवळ दुरूस्तीचे काम हाती घेऊन पूर्ण करण्यात आले होते. आता केलेल्या दुरुस्तीला एक वर्ष देखील पूर्ण झालेले नसताना पुन्हा सात लाख रूपये इतकी दुरूस्ती धरण्यात आलेली आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून रेंगाळत सुरू असलेल्या कामामुळे रूग्णांना सेवा देण्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ह्या सर्व गोष्टी सरपंच घोटेकर यांनी आरोग्य विभागाचे बांधकाम अभियंता विधाते यांच्या सोबत उपकेंद्रांवर ठेकेदारासोबत भेट देऊन निदर्शनास आणून दिल्या. यावेळी सरपंच योगेश घोटेकर यांच्या समवेत रामनाथ खुळे, संपत खुळे, विक्रम खुळे, राहुल खुळे, विलास खुळे, अमोल अढांगळे, रवी माळी, अभियंता विधाते, आरोग्य अधिकारी राऊत आदी उपस्थित होते. मात्र अद्याप कामात अपेक्षित सुधारणा न झाल्याने ही बाब पत्राद्वारे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांना कळवत भेट घेतली आहे. तसेच जोपर्यंत अंदाजपत्रकानुसार काम होत नाही तोपर्यंत सदर ठेकेदाराचे कुठलेही देयक अदा करू नये अशी विनंती केली आहे.
------------------
शासकीय निधीचा राजरोसपणे अपव्यय होत असताना देखील प्रशासकीय यंत्रणा डोळेझाक का करत आहे ? त्याचबरोबर सुस्थितीत असलेल्या टाईल्स तोडून नव्या बसविण्यामागे कुठला उद्देश अंदाजपत्रक बनवताना होता हे अद्याप लक्षात आलेले नाही. गुणवत्तापूर्ण काम झाल्याखेरीज जिल्हा परिषदने बिले अदा करू नये.
योगेश घोटेकर, सरपंच, वडांगळी
------------------
वडांगळी आरोग्य उपकेंद्रातील कामांची पाहणी करताना सरपंच योगेश घोटेकर, समवेत आरोग्य विभागाचे अधिकारी. (३१ सिन्नर १)