सिडको : येथील उत्तमनगर भागातील पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी सकाळच्या सुमारास अचानक फुटून नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने लोकांची तारांबळ उडाली. तसेच परिसरातील रस्त्यांवरही हजारो लिटर पाणी वाया गेल्याने नागरिकांनी मनपाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला.महापालिकेच्या वतीने सकाळ सुमारास उपआयुक्त रोहिदास दोरपूरकर यांच्या उपस्थितीत विजयनगर भागात पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. याच दरम्यान मनपाच्या पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे उत्तमनगर भागात पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. तसेच अनेक नागरिकांच्या घरातही पाणी शिरल्याने त्यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्याचेही नुकसान झाले. यामुळे नागरिकांनी मनपाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. भर उन्हाळ्यात अचानक गुडघ्याइतके पाणी घरात शिरल्याने नागरिकांना पाऊस पडल्याचा भास झाला होता. मनपाच्या नियोजनशून्य कारभारामुळे जलवाहिनी फुटणे, जलवाहिनीला गळती लागण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. परंतु यानंतरही मनपाकडून याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.गंगापूर धरणात अल्प पाणीसाठा असल्याने मनपाच्या वतीने संपूर्ण शहरभर एक दिवस पाणीकपात के ली असून, नागरिकांनाही पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर मनपाने सिडको भागात दंडात्मक कारवाईदेखील सुरू केली आहे. मनपाने संपूर्ण शहरात पाणी बचतीबाबत व पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्याची गरज असताना ही मोहीम फक्त सिडको भागातच राबविण्यात येत असल्यानेही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)
जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया
By admin | Published: March 09, 2016 11:01 PM