नाशिक : काळ आला होता; पण वेळ नाही...दैव बलवत्तर असल्यामुळे नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर झालेल्या विचित्र भीषण अपघातात २२ प्रवाशी किरकोळ स्वरुपात जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दोन बस, जीप, ट्रॅक्टर अशा एकूण चार वाहनांमध्ये अपघाताची घटना त्र्यंबकेश्वर-नाशिक रस्त्यावरील अंजनेरी शिवारात एका अपघाती वळणावर अचानकपणे पुढे जाणा-या वाहनाने ब्रेक लावल्याने पाठीमागून येणारी वाहने एकापाठोपाठ एकमेकांवर येऊन आदळली. यामुळे बस, ट्रॅक्टर, जीप मधील सुमारे २२ प्रवाशी किरकोळ स्वरुपात जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी सांगितली. या अपघातात त्र्यंबकेश्वरकडून नाशिककडे येणारा वारक-यांचा ट्रॅक्टर (एम.एच३८.बी.१०६०), महिंद्र जीप (एम.एच १५ ईक्यू ७६४८), पिंपळगाव आगाराची बस (एम.एच१२ ईएफ ६९१५), मनमाड आगाराची बस (एमएच ४०.एन.८८००) ही चार वाहने अपघातग्रस्त झाली आहेत. अपघाताची माहिती मिळताच तातडीने त्र्यंबके श्वर ग्रामिण रुग्णालयात सज्ज असलेल्या राज्य शासनाच्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचल्या. अपघातग्रस्त वाहनांमधून त्वरित स्थानिक नागरिक व पोलिसांनी जखमींना बाहेर काढत रुग्णवाहिकेत बसवून त्र्यंबकेश्वर ग्रामिण रुग्णालयात हलविले. जखमींची संख्या अधिक असल्यामुळे जिल्हा रुग्णालय, नाशिकवरूनही रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या होत्या. तीन जखमी प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या भीषण अपघातात वाहनांचे नुकसान अधिक असले तरी प्रवाशांना जास्त गंभीर मार लागलेला नसून सर्व प्रवाशी किरकोळ जखमी असल्याचे त्र्यंबकेश्वर पोलिसांनी सांगितले.