पाथर्डी फाटा : पाथर्डी फाटा परिसरातील निसर्ग कॉलनी भागात ऐन पाणीटंचाईच्या काळात नवीन जलवाहिनीतून वॉशआउटच्या नावाखाली हजारो लिटर पाणी वाया गेल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.प्रभाग क्र. ५२ मधील आनंदनगर येथे वीस लाख लिटर क्षमतेच्या नवीन जलकुंभाचे लोकार्पण गेल्या २६ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. दीर्घकाळ रखडलेले जलकुंभाचे काम अन् नंतर सर्व तांत्रिक बाबींसाठी लागलेला वेळ म्हणून जलकुंभाच्या लोकार्पणास उशीर झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र लोकार्पण होऊनही नवीन वाहिन्या जोडणे आणि वॉशआउट करणे अद्याप बाकी होते, हे या घटनेवरून दिसून येते.पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता संजीव बच्छाव यांना याविषयी विचारले असता त्यांनीही क्रॉस कनेक्शन्सची कामे आता पूर्ण झाली असून, शेवटच्या वाहिनीवरील पाणीपुरवठ्यात मातीमिश्रित पाणी येत असल्याच्या तक्रारी आल्याने मंगळवारी त्यात थोडेफार पाणी वाया गेल्याचे सांगितले. मात्र तेथे उपस्थित नागरिकांनी पाणी वाया जाण्याला अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचे नमूद केले असून, अधिकारी सांगतात त्यापेक्षा कितीतरी जास्त पाणी वाया गेले, असे पप्पू जाचक, सागर डेमसे, प्रशांत शेजवळ आदिंनी सांगितले. (प्रतिनिधी)
वॉशआउटमुळे पाणी वाया
By admin | Published: March 08, 2016 11:32 PM