नाशिक : नाशकातील सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते नदीत सोडले जात असल्याचा दावा पालिकेकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात मलनिस्सारण केंद्रे नावालाच असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. त्यामुळे गोदावरी प्रदूषित झाली आहे.शहराच्या सांडपाणी व्यवस्थापन आराखड्यानुसार महापालिकेकडून आठ विभाग करण्यात आले आहेत. यातील चार विभागांतील मलनिस्सारण केंद्रे कार्यान्वित असून, पाचवे केंद्रही लवकरच सुरू होणार आहे, तसेच सहाव्या केंद्र्राच्या उभारणीसाठी पिंपळगाव खांब येथे भूसंपादन प्रक्रिया राबविली जात आहे. सुरू असलेल्या चार केंद्रांची एकूण क्षमता ३४२.५० एमएलडी इतकी आहे. सर्व मलनिस्सारण केंद्रांमधील यंत्रणा कुचकामी झाली असून, सांडपाण्यावर कुठलीही प्रक्रिया न करता, पाणी तसेच नदीपात्रात सोडले जाते, असा आरोप पर्यावरणतज्ज्ञांमधून केला जात आहे. सांडपाणी थेट गोदेत जात असल्याने नदीपात्रातील बायो ऑक्सिजन डिमांडचे प्रमाण जवळपास 30 पेक्षा अधिक आहे. हे प्रमाण सुधारित निकषानुसार 10 असणे गरजेचे आहे. भुयारी गटार अन् पावसाळी गटारींचा गुंताजवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत महापालिकेने शहरात भुयारी गटार आणि भुयारी पावसाळी गटार योजनेची कामे केली. ठिकठिकाणी भुयारी गटारी या थेट पावसाळी गटारीला जोडण्यात आलेल्या आहेत.पावसाळी गटारी थेट गोदावरीत सोडल्या आहेत. या गटारींमुळे पावसाच्या पाण्याबरोबरच सांडपाणीही गोदापात्रात मिसळते. या गटारींचा गुंता सोडविण्याची सूचनाही निरीने महापालिकेला केली आहे. अद्याप हा गुंता सुटलेला नाही. अत्याधुनिक यंत्रणेची उभारणी गरजेची : तपोवन, आगरटाकळी, पंचक, चेहडी, नांदूर दसक, गंगापूर याठिकाणी एसटीपी प्रकल्प कार्यान्वित आहेत. या एसटीपींची यंत्रणा जुनाट असून, ती आधुनिक करण्याची गरज आहे, तरच मलजलावर प्रक्रिया यशस्वी होऊन नदीपात्रात मिसळणारे पाणी प्रदूषणविरहित असेल, असे ‘निरी’चे म्हणणे आहे. गोदेच्या खोऱ्यातील जमीन सुपीक मानली जाते. गोदावरीचे सर्वाधिक प्रदूषण सांडपाणी व औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक द्रव्येमिश्रित पाण्यामुळे होत आहे. त्याचे गंभीर परिणाम मानवी आरोग्यासह जलचर जैवविविधतेवर होत आहेत. - राजेश पंडित, याचिकाकर्ता
प्रक्रिया न करताच सांडपाणी गोदावरीत, पर्यावरणप्रेमींकडून टीकेची झोड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 11:33 AM