देवळा : गुंजाळनगर येथे कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने होणाऱ्या वाढीला प्रतिबंध करण्यासाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, शासकीय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि.१४) बैठक घेण्यात आली. यावेळी कडक धोरण अवलंबण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गावातील काही ठरावीक व्यक्तींचे पथक तयार करून कोरोनाबाधित रुग्णांवर लक्ष ठेवत त्यांना सर्व शासकीय नियमांचे पालन करण्यास सक्ती करण्याचेही ठरविण्यात आले.
गावातील कोरोनाबाधित व्यक्तीच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना कोरोना चाचणी करून घेण्यास भाग पाडणे, चाचणी न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. विलगीकरणात असलेले रुग्ण घराबाहेर पडल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांना घरात थांबणे बंधनकारक राहील, तसे न केल्यास सदर व्यक्तीची सरकारी विलगीकरण कक्षात रवानगी करण्यात येईल.ज्या भागात जास्त रुग्ण आढळलेले आहेत, अशा भागातील सर्व लोकांची सरसकट रॅपिड अँटिजन टेस्ट करून घेणे व करोनाबाधित व्यक्तींना मानसिक व सामाजिक आधार देण्यासाठी संबंधित समिती प्रयत्न करणार आहे.ग्रामपंचायत प्रशासनाने पिण्याचे पाणी व कचरागाडीची सोय नियमित करून देणे, तसेच गावातील बंद असलेले किंवा नादुरुस्त झालेले पथदीप सुरू करणे, हातपंपांची देखभाल, दुरुस्ती करणे आदी कामे करण्याची ग्वाही दिली. बैठकीसाठी ग्रामसेवक वैभव निकम, आरोग्य उपकेंद्राच्या प्रतिनिधी सौ. दंडगव्हाळ, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, ह.भ.प. संजय धोंडगे, तंटामुक्तीचे अध्यक्ष दीपक जाधव, ग्रामपंचायत सदस्य डॉ. राजेंद्र गुंजाळ, सुजाता गुंजाळ, माजी सरपंच सतीश गुंजाळ, प्रवीण गुंजाळ, ज्ञानेश्वर देवरे, डॉ. संजय निकम, नितीन गुंजाळ, धनराज जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी पप्पू गुंजाळ, नानू आहेर, सामाजिक कार्यकर्ते संदीप देवरे, नीलेश देवरे, अंगणवाडी सेविका वैशाली आहेर आदींची उपस्थिती होती.शनिवारी लसीकरणग्रामपंचायतीच्या माध्यमातून शनिवार, दि.१७ एप्रिल रोजी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे शिबिर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर कोरोनाबाधित रुग्णांच्या घरी भेट देऊन त्यांना मास्कचा वापर व घराच्या बाहेर न पडण्याची सक्त ताकीद देण्यात आली.