कळम तालुक्यातील बहुतांश भटके लोक शहरात येऊन गजरा, कचरा संकलनाच्या पिशव्या विक्रीचा हातावरचा व्यवसाय करताना, विविध सिग्नल व वर्दळीच्या चौकांमध्ये नजरेस पडतात. ५ जून, २०२१ साली कळम भागातील एका दरोड्यादरम्यान, वाॅचमनची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी कळम पोलीस ठाण्यात खुनासह दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नाशिक शहरात मोठ्या संख्येने कळमचे भटके गजरा विक्रेते वास्तव्यास असल्याचे समजले. यानंतर, एका पथकाने शहरात दाखल होऊन मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पाेलीस निरिक्षक विजय ढमाळ यांची गुरुवारी (दि.१५) भेट घेतली. त्यांना गुन्ह्यासंबंधी आवश्यक ती सर्व माहिती आणि संशयित आरोपींचे वर्णनही कळम पोलिसांच्या पथकाने दिले. यानंतर, पथक माघारी गेले. ढमाळ यांनी तत्काळ गुन्हे शोध पथकाला याबाबत तपासाचे आदेश दिले. दरम्यान, द्वारका ते मुंबई नाक्यापर्यंत महामार्ग परिसरात गजरा विक्री करणाऱ्या कुटुंबीयांची चौकशी पोलिसांनी सुरू केली, तसेच साध्या वेशात संशयित कुटुंबीयांवर पाळत पोलिसांकडून ठेवण्यात येत होती.
--इन्फो--
गजरा विक्रेत्यांमध्ये मिसळून वावर
उड्डाणपुलाखालील गजरा विक्रेत्यांच्या एका कुटुंबात संशयित तरुण येऊन मिळून-मिसळून राहत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्याचे वर्णन गुन्ह्यातील संशयिताप्रमाणे मिळतेजुळते असल्याची खात्री पोलिसांनी केली. त्याच्यावर पाळत ठेवत दादासाहेब गायकवाड सभागृहामागून नंदिनीच्या काठालगतच्या रस्त्यावर पोलिसांनी सापळा रचला. या ठिकाणी गजरा विक्रीचा बनाव करणारा संशयित सुनील नाना काळे (२७, रा.मुंबई नाका सर्कल, मुळ, रा.तेर, पारधी पेढी, ता.कळम) गुन्हेगार आला असता, पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, काळे याने कळमच्या गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपासाकरिता त्यास कळम पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
---इन्फो---
पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न
पोलिसांच्या पथकाची चाहूल लागताच, संशयित काळे हा पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याचा दूरवर पाठलाग केला. दरम्यान, काळे हा नंदिनी नदीच्या पात्रात उतरून शिवाजीवाडीच्या झोपडपट्टीच्या दिशेने पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना, शिताफीने मुंबई नाका गुन्हे शोध पथकाने त्यास घेरून मुसक्या बांधल्या.