लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील शेतकरी वर्गाला रब्बी हंगामाबरोबरचं खरीप हंगामातही अनेक संकटाचा व समस्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे दोन्ही हंगामातील बळीराजाच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे.शेतीप्रधान देशात शेतकरी वर्गाला एवढ्या समस्यांना व संकटांना तोंड द्यावे लागत असल्यामुळे जगाचा पोशिंदा हतबल झाला आहे. प्रत्येक हंगामात आशेवर जगणारा शेतकरी वर्ग दोन्ही हंगामात कोरोना, लॉकडाऊन, वातावरणातील बदल, निसर्गाची अवकृपा आदी संकटानी कसे बाहेर पडता येईल, या विवंचेनत सापडला आहे. द्राक्षे हंगामात पिक चांगले आले पण कोरोनाने तोंडचा घास हिरावून घेतला. द्राक्षे पिक कवडीमोल भावाने विकावे लागले. बेदाणा केला तोही भाव न मिळाल्याने घरात पडून राहिला. जवळचे भांडवल खर्च करून हातात काहीच आले नाही. शेवटी नगदी भांडवल मिळून देणारे पिक म्हणून कांदा पिकांवरील आशा शेतकरी वर्गाला भक्कम आधार देईल अशी अवस्था निर्माण झाली. परंतु कोरोनामुळे कांदाही कवडीमोल भावाने विकावा लागला. यानंतर खरीप हंगामावर अस्मानी व सुलतानी संकटाचा घाला निर्माण झाला. त्यामुळे कांदा पिकाला उतरती कळा लागली. हवामानामुळे काही शेतकरी वर्गाचा कांदा सडून गेला, काहीना मोड फुटले, तर काहीनी सडलेला कांदा फेकून दिला.असे चित्र दिसत असताना कांदा संपण्याच्या मार्गावर असतांना बाजारपेठेत कांदा आवक कमी झाल्याने मागणी वाढली. त्यामुळे कांदा पिकाला भाव वाढत गेला. पण तोपर्यंत शेतकरी वर्गाचा कांदा संपून गेला होता. त्यामुळे मोठ्या मेहनतीने काही शेतकरी वर्गाने कांदा साठवून ठेवला होता. त्यांना फायदा झाला. पण तोपर्यंत भांडवल जास्त प्रमाणात खर्च झाले होते. त्यामुळे याही पिकांने काहींना हसविले तर काहींना रडविले.टमाटे पिकाला पसंती देऊन अनेक कष्टांतुन रोपे उपलब्ध करून टमाटा पिकं घेण्यासाठी मोर्चेबांधणी केली. परंतु वातावरणातील बदल, पावसाचा लहरीपणा यामुळे रोपे खराब झाली. पावसाने टमाटे पिकांना मोठ्या प्रमाणात हादरा बसला. आता टमाटा पिकाला चांगला भाव आहे. परंतु जी सरासरी पाहिजे ती मिळत नसल्याने बळीराजाच्या भुवया उंचावल्या आहेत. अनेक महागडे किंमतीचेऔषधांची खरेदी करून जे उत्पन्न पाहिजे ते मिळत नाही. त्यामुळे तालुक्यातील बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.