चणकापूर वाढीव उजव्या कालव्याला पूरपाणी सोडताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, रामेश्वरचे उपसरपंच विजय पगार व ग्रामस्थ.
खर्डे : चणकापूर वाढीव उजव्या कालव्याला पूरपाणी सोडण्यात आले असून टप्प्याटप्प्याने लाभक्षेत्रातील सर्व गावांना मुबलक प्रमाणात पूरपाणी मिळणार असल्याने सर्वांनी संयम ठेवावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी केले.गेल्या आठवड्यात चणकापूर धरणाच्या लाभक्षेत्रात पाऊस नसल्याने चणकापूर उजव्या कालव्याचे पाणी बंद करण्यात आले होते; मात्र गेल्या तीन दिवसांपासून चणकापूर धरणाच्या लाभक्षेत्रात मुबलक पाऊस झाल्याने चणकापूर उजव्या कालव्याला पुन्हा पूरपाणी सोडण्यात आले आहे. पर्यायाने रामेश्वरपासून पुढील वाढीव उजव्या कालव्यालादेखील गुरुवारी (दि.२०) जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, रामेश्वरचे उपसरपंच विजय पगार यांच्या उपस्थितीत पूरपाणी सोडण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. देवळा तालुक्यात संपूर्ण पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला होता; मात्र दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळण्यास मदत होणार असली तरी पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे विहिरींनी तळ गाठला आहे.चणकापूर वाढीव कालव्याला पूरपाणी सोडण्यात आल्याने लाभक्षेत्रातील सर्व लहान -मोठे बंधारे भरण्यास मदत होणार आहे. यावेळी वाखारी, खुंटेवाडी, वाखारवाडी, पिंपळगाव, दहीवड, मेशी, उमराणे येथील ग्रामस्थ व पाटबंधारे विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.