कळवण : श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर पाण्याचे १०८ कुंड व झरे आहेत. त्यापैकी चमुली कुंडाचे १५ दिवसांपासून खोदकाम सुरू आहे. या कुंडाचे खोदकाम सुरू असताना पाणी लागले असून, जिवंत पाण्याचा स्रोत सुरू झाल्याने ग्रामस्थ व भाविकांत समाधान व आनंदाचे वातावरण आहे.गडावर देवी दर्शनासाठी शाळांना उन्हाळी सुट्टी असल्याने भाविकांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे गडावर उपलब्ध पाणी कमी पडत असल्याने ग्रामपंचायतीने ग्रामनिधी व पेसा अंतर्गत जुन्या पाण्याचे स्रोत शोधून त्याचे खोदकाम सुरू केले आहे. देवीचे दर्शन घेऊन उतरत्या पायरीच्या शेवटी ओम गुरु देव आश्रम व जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे एक हातपंप होता. या पंपाला बाराही महिने पाणी असायचे; मात्र काही महिन्यांपूर्वी त्यात माती पडून हा हातपंप बंद पडला होता. याठिकाणी ग्रामपंचायतीने १५ दिवसांपूर्वी विहिरीचे खोदकाम सुरू केले होते. पाणी पाहून ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ व भाविकांनी आनंद साजरा केला. अजून २० फूट खोदकाम केल्यास पाणीसाठाही वाढणार आहे. तसेच गंगा- जमुना-देवनळी या विहिरींचे पाणी एकत्रित करून ठिकठिकाणी उभारलेल्या पाण्याच्या टाक्यांमध्ये थेट पाइपलाइनने पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे पाण्याच्या टॅँकरचा खर्च वाचणार आहे.महाराष्ट्रासह देशात दुष्काळी परिस्थिती असताना समुद्र सपाटीपासून ४५०० फूट उंचावरील सप्तशृंगी मातेच्या डोंगरावर विहिरीच्या खोदकामात ४५ फुटावर पाणी लागल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पाणी बघण्यासाठी गावकऱ्यांनी गर्दी केली होती.
गडावरील चमुली विहिरीला पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 6:21 PM
श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर पाण्याचे १०८ कुंड व झरे आहेत. त्यापैकी चमुली कुंडाचे १५ दिवसांपासून खोदकाम सुरू आहे. या कुंडाचे खोदकाम सुरू असताना पाणी लागले असून, जिवंत पाण्याचा स्रोत सुरू झाल्याने ग्रामस्थ व भाविकांत समाधान व आनंदाचे वातावरण आहे.
ठळक मुद्दे१५ दिवस खोदकाम : ग्रामस्थ, भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण