सिडको : गेल्या काही दिवसांपासून येथील प्रभाग क्रमांक २६ मधील खुटवडनगरसह बहुतांशी भागात नागरिकांना पिण्यापुरतेही पाणी मिळत नसल्याने प्रभागातील पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. पाणीपुरवठा होत नसल्याचे मनपाला कळवूनही दखल घेत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.सिडकोतील खुटवडनगर, शिवशक्ती चौक यांसह संपूर्ण प्रभाग २६ मधील पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. यामुळे नागरिकांना पिण्यापुरतेही पाणी मिळत नाही. महापालिकेच्या सिडको पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना कळवूनही दखल घेतली नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून खुटवडनगर भागातील नागरिकांचा पाणीप्रश्न बिकट झाला आहे. तर यात प्रभागातील शिवशक्ती चौक व परिसरात काही प्रमाणात पाणीपुरवठा होत असला तरी तोदेखील गढूळ व दूषित होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.खुटवडनगरसह संपूर्ण प्रभागाचा पाणीप्रश्न गंभीर झाला आहे. पाणीपुरवठा सुरळीत करावा याबाबत महिलावर्गाच्या अनेक तक्रारी येत असून, याबाबत मनपाच्या अधिकाऱ्यांना पाणीप्रश्नाबाबत विचारणा केली असता अधिकारी दूरध्वनीवर देखील उपलब्ध नसतात. लोकसभेची आदर्श आचारसंहिता असल्याने अधिकारी बिनधास्त झाले असून, पाणीप्रश्नाकडे काणाडोळा करीत असल्याचा आरोप प्रभागाच्या नगरसेवक अलका अहिरे व कैलास अहिरे यांनी केला आहे.
खुटवडनगर भागात पाणीप्रश्न गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:50 AM