नाशिक- गेल्या पंधरवाड्यापासून शहरात करण्यात आलेली पाणी कपात तूर्तास रद्द करण्यात आली आहे. अर्थात, शहराला पाणी पुरवठा करणारी धरणे भरेली नसल्याने गरज पडल्यास पुन्हा पाणी कपात करण्याचे संकेत आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत.
महापालिकेच्या खाते प्रमुखांची बैठक साेमवारी (दि.२) पार पडली. यावेळी अधिकाऱ्यांकडून धरण स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आयुक्तांनी साप्ताहिक पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय जाहीर केले. नाशिक शहरातला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण ७६ टक्के भरले असून दारणा धरणात ७५ तर मुकणे धरणात ५१ टक्के इतका साठा झाला आहे. त्यामुळे शहरवासियांची गैरसाय टाळण्यासाठी पाणी कपात तुर्तास रद्द करण्यात आल्याचे आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले. अर्थात, कोणतेही धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. त्यामुळे नागरीकांनी पाणी जपून वापरावे तसेच यापुढे पावसाने ओढ दिली आणि धरण भरले नाही तर त्या त्या वेळी धरण साठ्याचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असेही आयुक्तांनी सांगितले.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील साठा ३३ टक्कयांपर्यंत कमी झाला त्यातच पावसाने ओढ दिल्याने नाशिककरांवर जलसंकट घोंघावत होते. त्यामुळे महापालिकेने आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या आठवड्यात बुधवारी तर त्या अगोदरच्या आठवड्यात गुरूवारी पाणी पुरवठा बंद ठेवल्याने सुमारे १८ दश लक्ष घन फुट पाणी प्रति दिन वाचले होते.