सातपूर : बुधवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने दाणादाण उडविली. जनजीवन विस्कळीत होण्याबरोबरच घरांमध्ये पावसाचे पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने सातपूरकरांना अक्षरश: झोडपून काढले. रस्त्यावरील भाजीपाला आणि किरकोळ विक्रे त्यांची चांगलीच धावपळ उडाली. रस्त्यावर एक फूट पावसाचे पाणी साचले होते.दरम्यान, सिडको, पाथर्डी फाटा, अंबड गाव भागातील काही घरांमध्येदेखील पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. श्रमिकनगर येथील माळी कॉलनीतील जितेंद्र यादव यांच्या नम्रता निवासमध्ये पावसाचे पाणी शिरले. पावसाचे पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात शिरल्याने यादव यांनी अखेर सातपूर अग्निशमन केंद्राकडे मदत मागितली. अग्निशमन केंद्राचा एक बंब आणि कर्मचाऱ्यांनी यादव यांच्या घरातील पाणी बाहेर काढले.नासर्डीला पूर; उंटवाडी पुलाला लागले पाणीसिडको : परिसरात बुधवारी (दि.२५) सायंकाळी विजेच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे सिडको भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच नासर्डी नदीला पूर आल्याने उंटवाडी तसेच आयटीआय पुलाला पाणी लागले होते. तर सखल भागात पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. सिडको परिसरात काल सायंकाळी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. या अचानक झालेल्या पावसामुळे सिडको भागातील सखल भागात पाणी साचले होते. यात जुने सिडकोतील खोडे मळा परिसरातील वृंदावननगर, मंगलमूर्तीनगर, पंडितनगर, बडदेनगर, गोपालकृष्ण चौक, इंदिरा गांधी वसाहत, गणेश चौक, उत्तमनगर, अंबड भागातील महालक्ष्मीनगर, डीजीपीनगर, खुटवडनगर या भागातील खोलगट भागात पाणी साचले होते. मुसळधार पावसामुळे नासर्डी नदीला पूर आला होता. त्यामुळे उंटवाडी व आयटीआय पुलाला पाणी लागले होते. याठिकाणी अंबड पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
उपनगरांमध्ये घरात शिरले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 1:21 AM