नाशिक जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बैठक आयोजित केली हाेती. या वेळी पाणीसाठ्याचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर आयुक्त कैलास जाधव यांनी गुरुवारी पाणीकपात केली जाईल, असे सांगितले. याआधी बुधवारी पाणीकपातीचे नियाेजन होते. मात्र, मंगळवारी (दि. २०) आषाढी एकादशी तर बुधवारी (दि. २१) बकरी ईद असल्याने गुरुवारी पाणीकपात केली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले.
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात पुरेसा साठा नसून महापालिकेचे आरक्षण संपुष्टात आले आहे. धरणात पुरेसा साठा नसल्याने पाण्याचे फेरनियोजन करण्याच्या सूचना गेल्या आठवड्यात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना केली होती. जलसंपदा विभागानेही तसे पत्र महापालिकेला दिले होते. दरम्यान, महापौर सतीश कुलकर्णी यांनी गेल्या सोमवारी (दि. १२) पाणीपुरवठ्याचा आढावा घेताना शहरात रविवारपर्यंत (दि. १८) पाऊस न आल्यास दर बुधवारी एक दिवस पाणीकपात करण्यात येईल, असे जाहीर केले होते. दरम्यान, पावसाने दिलेली ओढ कायम असून, त्यामुळेच आता हा निर्णय घेण्यात आला आहे.