विरगाव : बागलाण तालुक्यात निर्माण झालेल्या अभूतपूर्व पाणीटंचाईची झळ नागरिकांसमवेत वन्य प्राणी व पशुपक्षांनाही बसतांना दिसून येत आहे. याचीच दखल घेत तालुका प्रहार संघटनेने वन्य प्राणी व पशुपक्षांसाठी औंदाणे (ता.बागलाण) येथील सुकड नाला परिसरात एक छोटेसे तळे तयार करून देण्यात आले. अल्प पर्जन्यमानामुळे बागलाण तालुक्यातील निम्म्याहून गावात भूमिगत जळपातळी मोठया प्रमाणात घटून सद्यस्थितीत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याच अनुषंगाने तालुक्यातील अनेक गावांना प्रशासनाकडून टँकरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. चालू वर्षी शेतीक्षेत्रात असणाऱ्या शेतकरी वर्गालाही प्रथमच पाण्याची मोठ्या प्रमाणात झळ बसत असून याचमुळे गाव असो की शेतीक्षेत्र यात सर्वत्र पाणी पाणी ची समस्या निर्माण झाल्याचे चित्र बघण्यास मिळत आहे. याची झळ एकीकडे नागरिकांना बसत असतांनाच सर्वाधिक फटका वन्यप्राणी, पशुपक्षी व सरपटणाºया प्राण्यांना बसतांना दिसून येत आहे. यामुळेच पाण्याच्या शोधार्थ हे वन्य प्राणी आता थेट नागरी वस्ती गाठत असून यातूनच या प्राण्यांकडून मानवावर होणार्या हल्ल्यात ही मोठया प्रमाणात वाढ झाली आहे.यावेळी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष तुषार खैरनार, वनपाल एन एन गांगुर्डे, जयप्रकाश शिरसाठ, वनरक्षक शितल दैतकार, गौतम पवार, इजाज शेख, महेंद्र खैरनार, रूपेश सोनवणे, कपिल सोनवणे आदी उपस्थित होते.
औंदाणेत वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 2:11 PM