नाशिक : साधुग्राम स्वच्छता ठेकाप्रकरणी वादग्रस्त ठेकेदार वॉटर ग्रेस प्रॉडक्ट्स कंपनी ही महापालिकेची थकबाकीदार आणि काळ्या यादीत आहे किंवा नाही हा प्रश्न आता प्रशासनानेच निकाली काढला असून, स्थायी समितीच्या अशासकीय ठरावानंतर सदर कंपनीला प्रशासनामार्फत काळ्या यादीतून काढण्याविषयी कुठलीही कार्यवाही झालेली नसल्याची कबुली दिली आहे. प्रशासनानेच स्पष्ट खुलासा केल्याने आता साधुग्राम स्वच्छता ठेका प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. सदर वादग्रस्त कंपनीविषयी शहानिशा न करता स्थायीवर प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्याचे प्रकरण आता प्रशासनावरच उलटण्याची शक्यता निर्माण झाली असून, येत्या गुरुवारी (दि.६) होणाऱ्या स्थायीच्या बैठकीत या साऱ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागणार आहे. साधुग्राम स्वच्छतेचा ठेका वादग्रस्त वॉटर ग्रेस प्रॉडक्ट्स कंपनीला देण्यास स्थायी समितीने नकार देत द्वितीय न्यूनतम निविदाधारक क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्याची शिफारस केली होती. स्थायीचे सदस्य प्रा. कुणाल वाघ व राहुल दिवे यांनी सर्वप्रथम या प्रकरणाला वाचा फोडत वॉटर ग्रेस प्रॉडक्ट्स कंपनी ही काळ्या यादीत असल्याने शिवाय लेखापरीक्षणातही त्यांच्याविरुद्ध आक्षेप नोंदविण्यात येऊन थकबाकीदार असल्याचे स्पष्ट केल्याने साधुग्राम स्वच्छतेचा ठेका देऊ नये, अशी भूमिका घेतली होती.वॉटर ग्रेस कंपनी काळ्या यादीतच(पान १ वरुन) त्यानंतर स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे यांनीही खंबीर भूमिका घेत काळ्या यादीतील आणि मनपाचे आर्थिक नुकसान करणाऱ्या ठेकेदाराला ठेका देण्यास स्पष्ट नकार दिला होता. दरम्यान, सदर वाद न्यायालयात गेल्यानंतर उच्च न्यायालयाने स्थायी समितीने दिलेला निर्णय रद्द ठरवत उचित निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. परंतु प्रशासनाकडून न्यायालयीन निर्णयाऐवजी वकिलाचे पत्र स्थायीवर ठेवण्यात आले आणि निर्णयाची प्रतीक्षा करण्यात आली. मात्र, स्थायी समितीने वकिलाच्या पत्रालाही केराची टोपली दाखवत वस्तुस्थिती स्थायीला अवगत करण्याची सूचना प्रशासनाला केली. दरम्यान, तातडीची गरज लक्षात घेता आणि न्यायालयाचा आदेश पाहता स्थायी समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांनी दि. ३१ जुलै रोजी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांना पत्र लिहून वॉटर ग्रेससंबंधी सत्य कथन करण्याचे कळविले. परंतु चार दिवस उलटूनही आयुक्तांकडून उत्तर प्राप्त होत नव्हते. जोपर्यंत प्रशासनाचा खुलासा प्राप्त होत नाही तोपर्यंत निर्णय न घेण्यावरही स्थायी समिती ठाम राहिली. अखेर मंगळवारी सायंकाळी उशिरा स्थायी समितीला अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांच्या स्वाक्षरीने खुलासा प्राप्त झाला असून, या खुलाशामुळे साधुग्राम स्वच्छता ठेक्याला वेगळे वळण मिळाले आहे. (प्रतिनिधी)
वॉटर ग्रेस कंपनी काळ्या यादीतच
By admin | Published: August 05, 2015 12:12 AM