घोटी : मुंबई-आग्रा महामार्गाचे पाच वर्षांपूर्वी चौपदरीकरण झाल्यानंतर हा रस्ता छेदून जाणाऱ्या शहरी भागाला जोडण्यासाठी तयार केलेल्या भुयारी मार्गात साचलेल्या पाण्याचा विसर्ग होत नसल्याने या भुयारी मार्गाचा तलावाचे स्वरूप आले आहे. घोटी शहराजवळ असणाऱ्या दोन्ही भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने लगतच्या नागरिकांना पाण्यातून मार्गक्रमण करावे लागत आहे.मुंबई - आग्रा महामार्गाचे गोंदे ते वडपे असे ९० किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे पाच वर्षांपूर्वी चौपदरीकरणाचे काम झाल्यानंतर शहरी भागातून जाणाऱ्या रस्त्याला भुयारी मार्ग ठेवण्यात आले आहेत. यात इगतपुरी तालुक्यात बोरटेंभे, घोटी शहरात दोन, खंबाळे, माणिकखांब व पाडळी आदि ठिकाणी भुयारी मार्गाची निर्मिती महामार्ग प्राधिकरणाने केली होती. मात्र हे काम करताना वाहतुकीचा अथवा रहदारीचा विचार न करता हे मार्ग तयार करण्यात आल्याने दर पावसाळ्यात या सर्व भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहत असल्याने या भुयारी मार्गाला तलावाचे स्वरूप आले आहे.या साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने नागरिकांना या पाण्यातून अथवा महामार्ग ओलांडून जीवघेणे मार्गक्रमण करावे लागत आहे. (वार्ताहर)
घोटीत भुयारी मार्गात पाणी
By admin | Published: July 17, 2016 1:06 AM