शिवसेना युवा नेते व विद्यमान पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते खेलो इंडिया खेलो उपक्रमांतर्गत राजे संभाजी स्टेडियम येथे मोठ्या दिमाखात व थाटामाटात उद्घाटन करण्यात आले होते. यात ६ कोटी रुपये निधी खर्च होणार असून राजे संभाजी स्टेडियम विविध विकासकामे करून कायापालट करण्यात येणार असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले होते. मात्र, काम सुरू होऊन दोन महिने उलटताच ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे सदर काम गेल्या वर्षभरापासून रेंगाळलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. क्रीडाप्रेमींना येथे सुविधा मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सिडकोसारख्या कामगार वस्तीतील कामगारांच्या मुलांना तसेच क्रीडाप्रेमींचे आरोग्य सुरक्षित राहावे, या उद्देशाने सिडको येथील अश्विननगर भागात खेळाडूंना खेळ खेळण्यासाठी नाशिक महापालिकेच्या माध्यमातून अश्विननगर येथे भव्यदिव्य अशा राजे संभाजी क्रीडासंकुलाची निर्मिती करण्यात आली होती. नागरिकांना, क्रीडाप्रेमींना नवनवीन सुविधा मिळाव्यात, यासाठी 'खेलो इंडिया खेलो अंतर्गत' राजे संभाजी स्टेडियम येथे खासदार हेमंत गोडसे यांच्या खासदार निधीतून सुमारे सहा कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या वतीनेदेखील कोट्यवधी रुपयांचा निधी यामध्ये देण्याचे ठरले होते. राजे संभाजी स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी वसतिगृह बांधण्यात येणार होते. पावसामुळे जॉगिंग ट्रॅकवर संपूर्ण पाणी साचले असून मैदानातदेखील मोठ्या प्रमाणात गाजरगवत वाढले आहे. यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भावदेखील मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. लवकरात लवकर काम पूर्ण करून क्रीडाप्रेमींना मैदान खुले करून द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
चौकट====
खुल्या आकाशी...
स्टेडियममधील अनेक पथदीप बंद अवस्थेत असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. स्टेडियममध्ये ठिकठिकाणी मातीचे ढिगारे पडले आहेत. सुरक्षारक्षक असून नसल्यासारखे आहे. टवाळखोर व मद्यपी स्टेडियममध्येच मद्यपान करत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
(फोटो १६ संभाजी, संभाजी एक)